छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व उपकेंद्रातील विभागांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे प्रवेश चाचणी परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीईटी परीक्षेसाठी १५ ते २५ मे दरम्यान नोंदणी केली जाणार असून, त्यानंतर ३ ते १४ जून दरम्यान संंबंधित विभागांमध्ये ऑफलाईन पद्धतीने सीईटी होणार असल्याचे परिपत्रकाद्वारे विद्यापीठाने जाहीर केले आहे.
विद्यापीठाच्या २०२४-२५ शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वेळापत्रक जाहीर केले आहे. सीईटीचे ५० टक्के आणि अंतिम वर्षाच्या ऐच्छिक विषयाचे ५० टक्के गुण ग्राह्य धरून गुणवत्तेनुसार संबंधित अभ्यासक्रमास प्रवेश निश्चित केला जाणार आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ऑनलाईन नोंदणी होणार असून, सीईटी परीक्षाही स्वतंत्रपणे आयोजित केली आहे. सीईटी परीक्षा ही १०० गुणांची असणार आहे. त्यात एकूण ५० प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न प्रत्येकी दोन गुणांचे असणार आहेत. या परीक्षेसाठी प्रत्येक विभागानुसार वेळ आणि दिनांक वेगवेगळा ठरविला आहे. विद्यार्थ्यांस एखाद्या विषयाच्या सीईटीला मुकावे लागू नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने काळजी घेतल्याचेही वेळापत्रकावरून स्पष्ट झाले आहे.
असे असणार प्रवेश अन् सीईटीचे वेळापत्रकविद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १५ ते २५ मे दरम्यान ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर ३ ते १४ जून दरम्यान विविध विभागांमध्ये सीईटी होईल. सीईटीचे निकाल १५ जून रोजी घोषित केले जातील. त्यानंतर सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अभ्यासक्रमांना प्रवेशसाठी १६ ते २६ जून दरम्यान ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. त्याशिवाय पदवी परीक्षेच्या गुणांची कागदपत्रे विभागात जमा करावी लागतील. २९ जूनला प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. त्यानुसार १ ते ३ जुलै दरम्यान संबंधित विभागात प्रवेश देण्यात येतील. ५ जुलैला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. १३ जुलैला जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशनद्वारे प्रवेश दिले जातील. तसेच १५ जुलैपासून नियमित तासिकांना सुरुवात होणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे.