औरंगाबाद : वर्ग तुकड्या, शिक्षकांची पदे कायम राहावीत यासाठी बोगस पटसंख्या दाखविण्यात खोकडपुरा परिसरातील शिवाजी हायस्कूल पटाईत असल्याची माहिती समोर आली आहे. जि.प.च्या प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षणाधिकाºयांनी ही शाळा बंद करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून कार्यवाही हाती घेतल्याचेही समजते.१०० टक्के अनुदानित असलेल्या शिवाजी हायस्कूलमध्ये सोमवारी (दि.३) गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना लस देण्यात येणार होती. या शाळेत पटसंख्येवर असलेले विद्यार्थी प्रत्यक्षात या शाळेत नाहीत. रांजणगाव येथे याच संस्थेची दुसरी शाखा आहे. त्याठिकाणचे विद्यार्थी या शाळेच्या पटसंख्येवर दाखविण्यात आलेले आहेत. विविध शैक्षणिक मोहिमांच्या वेळी या शाळेतील विद्यार्थ्यांना आणण्यात येत असल्याचा प्रकार जि.प. च्या माध्यमिक व प्राथमिकच्या शिक्षणाधिºयांना माहिती असल्यामुळे मागील वेळी झालेल्या पटपडताळणी मोहिमेत ही शाळा दोषी आढळली आहे.माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी शाळांना दिवाळीच्या सुट्या लागण्याच्या शेवटच्या दिवशी (दि.३ नोव्हेंबर) शाळेची अचानक तपासणी केली असता, ६०० पटसंख्येपैकी अवघे २०० विद्यार्थीच शाळेत आढळून आले. यावेळी मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असता, ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी बनावट असल्याची लेखी माहिती मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला दिली. रांजणगाव शाळेसह अस्तित्वात नसलेल्या विद्यार्थ्यांचीही नावे पटावर नोंदविण्यात आल्याचे तपासणीत समोर आले होते. यावरून माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा बंद का करण्यात येऊ नये, अशी नोटीसच शाळेला काही दिवसांपूर्वी दिल्याचे डॉ. चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या नोटीसला शाळेने उत्तर दिलेले नसून, येत्या दोन दिवसांत शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले. प्राथमिक शाळेचीही हीच अवस्था असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी दिली. प्राथमिक शाळेतही बनावट पटसंख्या दाखविण्यात आलेली आहे. या प्रकरणात शाळेला अनेक वेळा नोटिसा दिल्या आहेत; मात्र शाळा व्यवस्थापन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्यामुळे शाळा बंद करण्याची कारवाई प्राथमिक शिक्षण विभागाने मागील महिनाभरापूर्वीच सुरू केल्याचेही जैस्वाल यांनी सांगितले.
खोकडपुऱ्यातील शिवाजी हायस्कूल बोगस पटसंख्येसाठी पटाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:29 PM