औरंगाबाद : लग्न झाल्यावर सुरू झालेला संसार पूर्णत्वाला येतो, तो अपत्यप्राप्तीने. अपत्यप्राप्ती होणे हा जोडप्यांसाठी आनंदाचा परमोच्च क्षण असतो. पण विविध कारणांमुळे अनेक दाम्पत्य या आनंदापासून वंचित राहतात. अशा दाम्पत्यांसाठी मूल दत्तक घेणे, हे एक वरदान असून मागील पाच वर्षांत औरंगाबाद शहरातून २११ बालकांना त्यांच्या हक्काचे आणि मायेचे घरकुल मिळाले आहे. साकार आणि भारतीय समाज सेवा केंद्र या दोन संस्थांमधून औरंगाबाद शहरात मूल दत्तक दिले जाते. मागील पाच वर्षांत भारतीय समाज सेवा केंद्राच्या माध्यमातून १०६ बालकांना, तर साकार संस्थेच्या माध्यमातून १०५ बालकांना दत्तक देण्यात आले आहे.
मूल दत्तक घेण्याविषयी पालकांमध्ये आता जागृृती आली असून योग्य वयात असतानाच पालक मूल दत्तक घेण्याचा विचार करतात, ही समाधानकारक बाब आहे. याशिवाय एक अपत्य स्वत:चे असतानाही दुसरे अपत्य दत्तक घेण्याकडेही अनेक पालकांचा कल आहे.
चौकट:-
वर्षनिहाय दत्तक बालकांची आकडेवारी
२०१६- ५४
२०१७- ३९
२०१८- ४८
२०१९- ३३
२०२०- ३७
- २०१६ मध्ये सर्वाधिक ५४ बालके घेतली दत्तक
चौकट :
मुली दत्तक घेण्याचे प्रमाण समाधानकारक
मुलगाच दत्तक घ्यायचा आहे, मुलगी नको, अशी पालकांची मानसिकता आता राहिलेली नाही. मुलींचा स्वीकार करण्यासही आता पालक मनापासून तयार असतात. त्यामुळे मागील काही वर्षांपासून दत्तक प्रक्रियेमध्ये मुलगा-मुलगी हा भेद राहिलेला नसून मुली दत्तक घेण्याचे प्रमाण समाधानकारक आहे, असे भारतीय समाज सेवा केंद्राच्या शाखा संचालिका वसुधा जातेगावकर यांनी सांगितले.
चौकट :
दत्तक घेण्यासाठी पालक प्रतीक्षेत
कोरोना, लॉकडाऊन याचा कोणताही परिणाम मूल दत्तक घेण्याविषयीच्या पालकांच्या इच्छेवर झालेला नाही. मूल दत्तक घेण्यासाठी पूर्वी पालक जसे उत्सुक असायचे, तसेच आताही आहेत. केवळ कोरोनामुळे सुरक्षेच्या कारणामुळे दत्तक प्रक्रियेत विलंब होत आहे, एवढाच काय तो या काळात झालेला बदल आहे.
चौकट :
सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटीच्या नियमानुसार आता पालक ज्या जिल्ह्यात राहणारे असतील, त्याच जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या संस्थांकडे त्यांनी मूल दत्तक घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी पालकांना त्यांची सर्व अत्यावश्यक कागदपत्रे यासोबतच मॅरेज सर्टिफिकेट, मूल दत्तक घेण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र संस्थेमध्ये दाखवून नोंदणी करणे गरजेचे असते.