औरंगाबाद : कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे आई किंवा वडील गमवावे लागले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. राज्यातील सर्व विद्यापीठांनी अशा विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू करून त्यांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. यासंदर्भात अभाविपचे निकेतन कोठारी यांनी कळविले आहे की, २५ ते ३१ मे दरम्यान संघटनेने राज्यभरात छात्र दरबार, छात्र संवाद, छात्र संसद या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या असून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे, कोरोनाच्या या काळात सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, जिमखाना, महाविद्यालय व शाळा विकास निधी, पार्किंग, ग्रंथालय शुल्क अशा विविध सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलेला नाही, अशा सुविधांचे शुल्क आकारले जाऊ नये. ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात असल्यामुळे परीक्षा शुल्कात कपात करण्यात यावी. या काळात क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली असून अशा सर्व विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी. स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे असलेले भरमसाठ शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. असंख्य विद्यार्थी ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत आपले शिक्षण पूर्ण करत असतात. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘मागेल त्याला काम’ या अनुषंगाने कमवा व शिका योजनेमध्ये काम द्यावे, जेणेकरून आर्थिक कारणांमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करून पालक व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असे नमूद केले आहे.
पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:04 AM