औरंगाबाद : ओएलएक्सवर शिलाई मशीन विक्रीची जाहिरात टाकणे एकजणाला चांगलेच महागात पडले. शिलाई मशीन खरेदी करण्याची थाप मारून आरोपीने त्यांच्या मोबाईलवर क्यूआर कोड पाठवून तो कोड स्कॅन करायला सांगून ८० हजार रुपये ऑनलाईन काढून फसवणूक केली. २ फेब्रुवारी रोजी पुंडलिकनगरात ही घटना झाली.
पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार बाळू लक्ष्मण बोडखे (वय ४२, रा. गल्ली क्र. १०, पुंडलिकनगर) हे शेंद्रा एमआयडीसीमधील खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांनी शिलाई मशीन विक्री करण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी ओएलएक्सवर जाहिरात टाकली होती. या जाहिरातीत त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक दिला होता. या क्रमांकावर त्या दिवशी रात्री ९ वाजता त्यांना मुंबईतील संगीता गुप्ता नाव सांगणाऱ्या महिलेचा फोन कॉल आला. त्यावेळी तिने शिलाई मशीन विकत घेण्यासाठी कॉल केल्याचे सांगितले. तिने ही शिलाई मशीन खरेदीसाठी १६ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. तिने बोडखे यांना पैसे पाठविते असे सांगून त्यांच्या व्हाॅटसॲपवर क्यू आर कोड पाठविला.
हा कोड स्कॅन केल्यावर तुमच्या खात्यात पैसे जमा होईल असे तिने सांगितले. पैसे न आल्याने तिने त्यांना पाचवेळा क्यूआर कोड स्कॅन करायला सांगितला. त्यांनी तिच्या सांगण्याप्रमाणे मोबाईलवर आलेला क्यूआर कोड स्कॅन केला. यादरम्यान तिने बोडखे यांच्या बँक खात्यातील रोख ८० हजार रुपये ऑनलाईन काढून घेतले. याचे मेसेज त्यांना प्राप्त झाल्यावरून बोडखे यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.