औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील बालरोग विभागातील सर्व खाटा बालरुग्णांनी बुधवारी भरून गेल्या. निमोनिया, व्हायरल फिव्हर, डेंग्यू, अतिसार यासह इतर आजारांचे बालरुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. ९६ पैक्की एकही बेड शिल्लक नसल्याची परिस्थिती बालरोग विभागात आहे.
वातावरणातील बदलाने शहरात बालकांना विषाणूजन्य आजारांनी विळखा घातला असून, सर्दी, खोकला, तापाने लहान मुले त्रस्त आहेत. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या १० पैकी ३ ते ४ रुग्णांना भरती करण्याची वेळ येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण आहे. पावसामुळे डास उत्पत्तीलाही हातभार लागत आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे फ्लू, विषाणूजन्य आजार, श्वसन विकार, डेंग्यूसदृश्य,‘हँड, फूट अँड माऊथ डिसिज’ आणि काही प्रमाणात जलजन्य आजारांनी बालकांना घेरले आहे.