औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बीएस्सी संगणकशास्त्र विषयात पदवी घेतलेली अफगाणिस्तानातील विद्यार्थिनी काकर खातेमा नूर मोहम्मद हिची पदवी रद्द करण्यात आली आहे.
प्रथम आणि द्वितीय वर्षात नापास असताना तिला तृतीय वर्षात माैलाना आझाद महाविद्यालयाने प्रवेश दिला. तो प्रवेश नियमबाह्य असल्याने तृतीय वर्षाचा प्रवेश रद्द करण्याचा आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गणेश मंझा यांनी दिला आहे, तसेच याप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य, तसेच तत्कालीन विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांची निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चाैकशीचा आदेश कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी दिला आहे.
याप्रकरणी मोहम्मद इसा मोहम्मद यासीन यांनी तक्रार दिली होती, तसेच विद्यार्थी सेनेचे डाॅ. तुकाराम सराफ यांनीही पाठपुरावा केला. अखेर दोन वर्षांनी प्राचार्य मजहर अहमद फारुकी आणि बीएस्सी संगणकशास्त्र विषयाची विद्यार्थिनी काकर खातेमा नूर मोहम्मद यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने काकर खातेमा या विद्यार्थिनीचा तृतीय वर्षाचा प्रवेश रद्द करण्याचा आदेश माैलाना आझाद महाविद्यालयाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी दिला आहे. या विद्यार्थिनीने उन्हाळी २०२० परीक्षेमध्ये एटीकेटी मिळालेल्या प्रथम व चतुर्थ सत्रातील सहा विषयांत, तसेच ५ ते ६ या सत्रातील १० विषय, अशा एकूण १५ विषयांची परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण केली. हे संशयास्पद वाटत असल्यामुळे विद्यार्थिनीने दिलेल्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तज्ज्ञ परीक्षकांकडून तपासून चाैकशी करण्याचा आदेश दिला आहे.
निवृत्त न्यायाधीशांमार्फत चाैकशीचे आदेशमाैलाना आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य व तत्कालीन जबाबदार अधिकाऱ्यांच्या गैरप्रकाराची चाैकशी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे करण्याचा निर्णय निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, तसेच काकर खातेमा हिचे पदवीची प्रमाणपत्र रद्द करण्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला.