लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जकात रद्द करावी या मागणीसाठी २००९-१० यावर्षी जिल्हा व्यापारी महासंघाने पुकारलेल्या संपामुळे त्यावेळेस बाजारपेठ सलग ४ दिवस बंद होती. ७ वर्षांनंतर सलग दोन दिवस बाजारपेठ पुन्हा बंद राहिली ती शहरात झालेल्या दगडफेक, जाळपोळीच्या घटनेमुळे.दोन दिवसांत शहरातील बाजारपेठेला सुमारे ८० ते १०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला. सलग दुसºया दिवशी (बुधवारी) प्रमुख बाजारपेठ संपूर्णपणे बंद राहिली. यात गुलमंडीपासून ते जाधववाडीपर्यंतचे व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे संपूर्ण शहरात रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. भाजीपाल्याची मुख्य अडत बाजारपेठ जाधववाडीत पहाटे अवघे १० ते १५ शेतकरीच शेतीमाल घेऊन आले होते. बंदमुळे किरकोळ विक्रेतेही जाधववाडीकडे फिरकले नाहीत.बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार जेथे ७० ते १०० टन फळे-भाजीपाल्याची आवक होते, तेथे आज केवळ ३० ते ४० क्विंटलच भाजीपाला विक्रीसाठी आला होता. अनेक अडत व्यापाºयांनी तर बुधवारी दुकानाचे शटरही उघडले नाही. धान्याचा अडत बाजार तर संपूर्णपणे बंदच होता. आज कोणत्याही धान्याची आवक झाली नाही, तसेच फळे घेऊन आलेले ट्रकही जाधववाडीत मुक्कामासाठी होते.जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, उद्या गुरुवारपासून शहरातील बाजारपेठ सुरळीत होतील. आता वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत येत आहे. यामुळे येत्या दिवसांत बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. या दृष्टीने व्यापारी तयारीला लागले आहे.४मोंढ्यातही अशीच परिस्थिती दिसून आली. येथील एकही दुकान आज उघडले नाही. शहराच्या हृदयस्थानी असलेले गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट, टिळकपथ, मछलीखडक, कुंभारवाडा, सिटीचौक, सराफा रोड ही मुख्य बाजारपेठही संपूर्णपणे बंद होती; मात्र किराडपुरा ते बुढीलेनपर्यंतच्या भागात नेहमीप्रमाणे दुकाने सुरू होती.४यासंदर्भात मराठवाडा चेंबर आॅफ कॉमर्स संघटनेचे अध्यक्ष प्रफुल मालाणी यांनी सांगितले की, सात वर्षांच्या कालखंडानंतर शहरातील संपूर्ण बाजारपेठ सलग दोन दिवस बंद राहिली. २००९-२०१० मध्ये जकात हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हा व्यापारी महासंघाने तेव्हा बाजारपेठ बंद पुकारला होता. त्यामुळे सलग चार दिवस बाजारपेठ बंद होती.४दोन वर्षांपूर्वी सराफा व्यापाºयांनी त्यांच्या मागणीसाठी बंद पुकारला होता. हा बंद तब्बल महिनाभर चालला; पण यात शहरातील सराफा व्यापारच बंद होता, तेव्हा अन्य बाजारपेठ सुरू होती. शहरात दगडफेक व जाळपोळीच्या घटनांमुळे व्यापाºयांनी मागील दोन दिवस आपले व्यवहार बंद ठेवले. यात शहराला ८० ते १०० कोटींचा आर्थिक फटका बसला.
७ वर्षांनंतर बाजारपेठ सलग २ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:23 AM