सोयगाव (औरंगाबाद ) : देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा नेहमी केला जातो. मात्र, देशात अजूनही अशी अनेक खेडी आहेत जिथे पायाभूत सुविधाही सरकारला पोहोचविता आलेल्या नाहीत. याचेच एक उदाहरण म्हणजे सोयगाव तालुक्यातील २२ गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही महामंडळाची बस पोहोचू शकली नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र हे देशात प्रगतिपथावर असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्यातच अशी परिस्थिती असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. माजी केंद्रीय मंत्री कै. बाबूरावजी काळे यांनी आदिवासीबहुल सोयगावला तालुका करण्याच्या मागणीसोबतच येथे बस आगार उभारण्याचीही मागणी लावून धरली होती. यानंतर मागणीने जोर धरून सोयगावला तालुक्याचा दर्जा मिळाला. तर वीस वर्षांपूर्वी येथे बस आगारही झाले. मात्र, अद्यापही तालुक्यातील २२ गावांमध्ये महामंडळाची बस पोहोचू शकली नाही. त्यामुळे अनेकांना पायी किंवा खाजगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागतो. यात तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गोंदेगावलाही तालुका आगाराची बससेवा मिळालेली नाही. तसेच सावळदबारा भागातील ८ खेड्यांमध्ये बससेवा पोहोचली नाही. बनोटी परिसरातील अनेक गावांची हीच अवस्था आहे. त्यामुळे या गावांमध्ये बससेवेसह प्राथमिक सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वृद्ध, महिला व रुग्णांचे हाल२२ गावांमध्ये बस जात नसल्याने याचा सर्वाधिक फटका वृद्ध, महिला व रुग्णांना सहन करावा लागतो. वृद्धांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा पायपीट करावी लागते. खाजगी वाहनधारकांकडूनही प्रवाशांची लूट होत असते.
तालुक्यातील प्रमुख गावांना एसटीचे दर्शनच नाहीतालुक्यातील काळदरी, वरठाण, पळाशी, वाडी, माळेगाव, पिंप्री, दस्तापूर, रावेरी, चारूतांडा, उपलखेडा ही तालुक्यातील प्रमुख १० गावे असून, या गावांत अद्यापही महामंडळाची बस फिरकलीच नाही. येथील ग्रामस्थांना तब्बल आठ ते दहा कि़मी. प्रवास करून बस गाठावी लागते. यामुळे या गावांतील विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी पायपीट करूनच शाळा गाठावी लागते.