केवळ २९ रुग्ण दाखल : एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज नाही
औरंगाबाद : कोरोना विळख्याच्या तब्बल ९ महिन्यांनंतर जिल्हा रुग्णालयात गुरुवारी दाखल २९ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नव्हता. गेल्या ९ महिन्यांत पहिल्यांदाच अशी स्थिती पहायला मिळाली. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी २०० खाटांची व्यवस्था केली होती. सप्टेंबरमध्ये या खाटाही अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे खाटांची संख्या ३०० पर्यंत वाढविण्यात आली. सप्टेंबरमध्ये रुग्णालयात २४ तासांत ऑक्सिजनचे १८० जम्बो सिलिंडर लागत होते. मात्र, ऑक्टोबरपासून काेरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली. त्यातही गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होत गेले. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही कमी होत गेली. जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनची मागणी २० टक्क्यांवर आली होती. त्यात गुरुवारी दाखल एकाही रुग्णाला ऑक्सिजन लावण्याची वेळ आली नाही. त्यामुळे अनेक महिन्यांनंतर दिवसभरात रुग्णांसाठी ऑक्सिजनचा वापर झाला नाही. रुग्णालयात पहिल्यांदाच एकही रुग्ण ऑक्सिजनवर नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
घाटीत ५२ रुग्ण गंभीर
घाटीत गुरुवारी दाखल गंभीर रुग्णांची संख्या ५२ होती. घाटीत रेफर होणाऱ्या रुग्णांमुळे गेल्या काही दिवसांपासून गंभीर रुग्णांची संख्या ५० च्या जवळपास कायम रहात आहे.