औरंगाबाद: मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजेच सुमारे ९९ दिवसांपासून ग्रामीण भागाचे ठप्प पडलेले अर्थकारण १९ जून सकाळी ७ वाजेपासून धावणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू केलेले लॉकडाऊनचे निर्बंध ७ जून रोजी मागे घेण्यात आल्यानंतर १२ दिवसांनी ग्रामीण भाग शासनाच्या वर्गवारीनुसार पहिल्या स्तरात आल्यामुळे गावगाडा पूर्ववत रुळावर येणार आहे. जमावबंदी आणि संचारबंदी १९ जूनपासून मागे घेण्यात आली आहे.
७ जून रोजी ग्रामीण भाग तिसऱ्या स्तरात आल्याने काही कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, १९ जूनपासून सर्व निर्बंध संपले आहेत. पूर्णपणे नियमितपणे ग्रामीण भाग सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात विवाह सोहळे, सार्वजनिक सोहळे, मैदानावरील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह व मैदानाच्या क्षमतेच्या ५० टक्के परवानगी असेल. अंत्यविधीसाठी १०० लोकांना परवानगी असेल. धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, स्विमिंग पूल बंद असतील. ७ जून रोजी लागू केलेले निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.
मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, हॉटेल्सना परवानगी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यातून जिल्ह्यातील ग्रामीण भाग १९ जून पासून सुटणार आहे. ७ जून रोजी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर ५.४६ टक्के तर २०.३४ टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापलेले होते. त्यामुळे जिल्ह्याची शासन नियमानुसार आलेली वर्गवारी तिसऱ्या स्तरावर होती. ही वर्गवारी आता पहिल्या स्तरात आली आहे. मॉल्स, चित्रपट, नाट्यगृहे, रेस्टाॅरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन केंद्र, उद्याने, मैदाने, खासगी आस्थापना नियमित वेळेत सुरू राहतील. बसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. कार्गाे सेवा पूर्णवेळ सुरू राहील. पाचव्या स्तरातील जिल्ह्यांतून प्रवासासाठी असलेले निर्बंध कायम आहेत.