वाळूज महानगर : तीन आठवड्यांपासून बंद असलेले वाळूज-कमळापूर या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी मध्यस्थी केल्याने शुक्रवारी सुरू करण्यात आले. २० दिवसांनंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामासाठी जवळपास ३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. महिनाभरापूर्वी या रस्त्याचे काम सुरू केले होते. ३ मार्चला गावातील काही लोकांनी निकृष्ट दर्जाचे व अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे काम होत नसल्याचा आरोप करून काम बंद पाडले होते. पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाळूजसह ग्रामीण भागातून औद्योगिकनगरीत ये-जा करणाऱ्या कामगारांना पंढरपूरमार्गे वळसा टाकून ये-जा करावी लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी बजाज आॅटो कंपनीच्या पार्किंग गेटवरून रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. मात्र, बजाज आॅटो कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे नवीन वसाहती व जुन्या गावातील वाहनधारक व नागरिकांना ये-जा करताना अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे.या रस्त्याचे काम बंद पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एच.के. ठाकूर, सहायक अभियंता विशाल हत्ते, ठेकेदार व्ही.टी. पाटील आदींनी शुक्रवारी वाळूज गावाला भेट दिली. यावेळी सभापती ज्योती गायकवाड, अविनाश गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेश दळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व नागरिकांशी चर्चा करून रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. या रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार सुरू असून, निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची शंका असल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करा. मात्र, रस्त्याच्या कामात अडथळा आणू नका, असा सल्लाही लोकप्रतिनिधींनी दिला. त्यामुळे शुक्रवारपासून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, आठवडाभरानंतर डांबरीकरणाचे काम सुरू केले जाणार असल्याचे सहायक अभियंता हत्ते व ठेकेदार व्ही.टी. पाटील यांनी सांगितले.