औरंगाबाद : शिक्षण घेतानाच कुटुंबातील सदस्यांनी नात्यातील मुलासोबत लग्न जमवले. त्यामुळे दोघे नियोजित वधू-वर बेगमपुऱ्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मग नवरदेवाने अचानक मागितलेल्या २० लाख रुपये हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने त्याने दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले. पीडितेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठात एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थिनीचे नात्यातील गोविंद जनार्धन घोडे (रा. खवने पिंप्री, ता. सेलू, जि. परभणी) यांच्यासोबत २०१६ मध्ये प्राथमिक बोलणीनंतर लग्न जमले हाेते. दोघांचे शिक्षण झाल्यानंतर लग्न करू, असा प्रस्ताव मुलाच्या कुटुंबानी दिला होता. पीडितेने विद्यापीठात २०१७ मध्ये एम.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. शिक्षण सुरू असताना ती वसतिगृहामध्ये राहत होती. तेव्हा तो मुलांच्या वसतिगृहातच राहत होता. लग्न ठरल्यामुळे दोघे सतत फोनवर बोलत होते. भेटत होते. मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे वसतिगृह बंद झाले. त्यामुळे पीडिता तिच्या आईसह भावी नवरा गोविंद घोडे यांच्यासह पार्वतीनगरमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली.
वधूचे कुटुंबीय लग्नाची तारीख काढण्याची चर्चा करीत होते. तेव्हा त्यांनी मुलीचे लग्न बाकी असून घर बांधायचे आहे. आपण थोडे थांबू, ही कामे झाल्यानंतर लग्न करू असे सांगितले. पुढे गोविंदने नोकरीसाठी २० लाख रुपये हुंडा द्यावा लागेल, अशी मागणी केली. त्यास नकार देताच त्याने लग्नास टाळाटाळ सुरू केली. २८ मे २०२१ रोजी त्याने माजलगाव तालुक्यातील एका मुलीशी लग्न केले. ही माहिती मिळाल्यानंतर पीडितेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी गुन्हा दाखल करून घेत, अधिक तपासासाठी प्रकरण उपनिरीक्षक राठोड यांच्याकडे दिले आहे.