वाळूज महानगर : वाळूजवाडीवासियांनी विविध नागरी सुविधा पुरविण्याचे आश्वासन मंगळवारी वाळूज ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आले आहे. या लेखी आश्वासनामुळे नागरिकांनी मतदानावरील बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
वाळूज ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या वाळूजवाडी प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांना अनेक वर्षांपासून विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुलभूत सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता. यामुळे गटविकास अधिकारी विद्याधर पाटील, ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे, ग्रामपंचायत सदस्य फैयाज कुरैशी आदींनी मंगळवारी वाळूजवाडीला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. क्लस्टरच्या निधीतून शाळा खोलीची दुरुस्ती, सिमेंट रस्ते, एलईडी पथदिवे, जलशुद्धीकरण प्रकल्प आदी सुविधा पुरविण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर भरत घुणावत, पवन घुणावत, माणिकलाल घुणावत, पांडुरंग आरगडे, राधेश्याम गोवर्धन, संतोष बह्मानवत, राहुल बह्मनावत आदींनी मतदानावरील बहिष्काराला निर्णय मागे घेतला.