फुलंब्री : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी अचानक पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन सुरु केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत दूरध्वनीवरून संपर्क साधून आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन रात्री १० वाजेनंतर मागे घेण्यात आले.तीन दिवस आंदोलन चालू असताना स्थानिक आमदार व खासदार यांच्यापैकी कुणीही आंदोलनाकडे फिरकले नाही. यामुळे आंदोलनकर्ते आक्रमक झाले. यातील सुधाकर शिंदे, नंदू मोटे, शैलेश बोरसे, प्रमोद गायकवाड, प्रभाकर भुसारी, ज्ञानेश्वर जाधव, काकासाहेब जाधव या सात कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी चार वाजता फुलंब्री येथील वरची वेस येथे असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले. जोपर्यंत या भागाचे आमदार, खासदार येथे येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी रात्री ८.३० वाजेपर्यंत आमदार येथे आले नाही तर टाकीवर असलेले कार्यकर्ते जलसमाधी घेतील असा इशारा दिला. पण आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे मुंबईला असल्याने त्यांना येथे येणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी दूरध्वनीवरून या आंदोलनकर्त्यांसोबत संपर्क साधला.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मी मराठा समाजाच्या सोबत असून सरकारकडे प्रयत्न करीत आहे, असे बागडे यांनी दूरध्वनीवरून सांगितले. मुंबईवरून आल्यानंतर मी भेट घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर कार्यकर्ते टाकीवरुन उतरले. आंदोलन सुरु झाल्यापासून उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले, तहसीलदार संगीता चव्हाण, नायब तहसीलदार उध्दव नाईक, प्रशांत काळे, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत , नगरपंचायत मुख्याधिकारी योगेश पाटील हे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करीत होते. आपली मागणी मी तात्काळ शासनाकडे पाठवत आहे, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांनीही लेखी पत्र देत कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले.
आश्वासनानंतर फुलंब्रीतील आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:08 AM