पुरूषोत्तम करवा माजलगावसर्वाधिक संख्याबळ असतानाही माजी मंत्री सुरेश धस यांच्या बंडामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता राष्ट्रवादीच्या हातातून निसटली. स्वकियांनीच दगाफटका केल्याने नाराज झालेले माजी मंत्री प्रकाश सोळंके पक्षत्याग करण्याच्या मन:स्थितीत असून, त्यांची पावले शिवसेनेच्या दिशेने वळू लागली आहेत.जि.प.मधील ६० पैकी २५ जागांवर राकाँचे उमेदवार विजयी झाले होते. काँग्रेस व काकू-नाना आघाडीने प्रत्येकी ३ ठिकाणी विजय मिळविला होता. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली ‘मॅजिक फिगर’ राकाँकडे होती. मात्र, माजी मंत्री धस यांनी आपले ५ सदस्य भाजपकडे वळविले, तर आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या एका सदस्याने अनुपस्थिती दर्शविली. त्यामुळे अध्यक्षपदाच्या दावेदार मंगल प्रकाश सोळंके यांना भाजपच्या सविता गोल्हार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. सोळंके यांनी पत्रकार परिषद घेऊन धस, क्षीरसागर, अक्षय मुंदडा यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ‘व्हीप’ डावलल्या प्रकरणी कारवाई न झाल्यास पक्ष सोडण्याचा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला होता. अजित पवार यांनी बंडखोरांवर कारवाईची तयारी दर्शविली असली तरी पत्नी मंगल सोळंके यांना लाल दिव्यापासून दूर राहावे लागल्याचा वार सोळंके यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बंडाळीला वैतागून त्यांनी दुसरी वाट चोखाळण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सोळंके यांनी माजलगावात भाजपचा सुपडा साफ करीत सर्वच्या सर्व ६ जागांवर राकाँला विजय मिळवून दिला होता. धारूर, वडवणीतही त्यांनी यश मिळविले होते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांच्या पत्नीचे नाव सर्वांत पुढे होते.याबाबत प्रकाश सोळंके यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
बदामरावांनंतर प्रकाश सोळंके शिवसेनेच्या वाटेवर
By admin | Published: March 24, 2017 11:42 PM