खुलताबाद: लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीचे बागेश्वर धाम धीरेंद्र शास्री महाराजांनी आज सकाळी दर्शन घेतले. दरम्यान, महाराजांनी एका शेतकऱ्याच्या घरी जावून जमिनीवर बसून चहा घेतला. महाराजांच्या साधेपणामुळे शेतकरी कुटुंब आणि भाविक भारावून गेले होते.
छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या दोन दिवसापासून प्रसिद्ध बागेश्वर धाम धीरेंद्र शास्री महाराजांची हनुमान कथा सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी सकाळी ११:३० वाजता खुलताबाद येथे हनुमानभक्त धीरेंद्र शास्री महाराजांचे आगमन झाले. त्यानंतर महाराजांनी भद्रा मारुतीचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले. महाराज येणार असल्याचे समजताच खुलताबाद येथील शेकडो भाविकांनी मंदीर परिसरात गर्दी केली होती.
दर्शन घेतल्यानंतर धीरेंद्र शास्री महाराजांनी शेतकऱ्याच्या घरी चहापाणी घेणार असल्याचे सांगितले. मंदीर परिसरात फुलंब्री रोडवर भीमराव व सुभाष फुलारे हे दोघे शेतकरी भाऊ आपल्या कुंटुबियासह वास्तव्यास आहेत. फुलारे यांच्या घरी धीरेंद्र शास्री महाराजांनी जमिनीवर बसून चहापाण केले. यावेळी त्यांनी भीमराव फुलारे यांच्या आई व कुटुंबियाशी आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, शहराध्यक्ष सतीश दांडेकर, भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ, माजी नगरसेवक परसराम बारगळ, योगेश बारगळ, माजी उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, भद्रा मारूती संस्थानचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे,ज्ञानेश्वर बारगळ आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.