औरंगाबाद: समृद्धी महामार्गाचा डोंगर कोरण्यासाठी केलेल्या स्फोटानंतर तासाभराने काम करण्यासाठी गेलेल्या मजुराच्या डोक्यावर दगड कोसळ्ल्याने तो घटनास्थळीच ठार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चिमनपुरवाडी येथे झाली.
शेख मुस्तकिन उर्फ राजू शेख कय्यूम (१७, रा. जटवाडा) असे मयताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मुस्तकिन उर्फ राजू दिड ते दोन वर्षापासून समृद्धीमहामार्गाच्या कामासाठी मजूर म्हणून जात होता. चिमणपुरवाडी ते दौलताबाद दरम्यान असलेल्या डोंगरातून रास्ता करण्याचे काम सध्या सुरू आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी आज सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास डोंगरात स्फोट करण्यात आला. यानंतर तासाभराने ८:३० ते ८:४५ वाजेच्या सुमारास राजू आणि अन्य मजूर आकाश चव्हाण, राम राठोड, रफिक शेख आणि सिराज शेख नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. मुस्तकिन उर्फ राजू डोंगरकड्याजवळ कालपर्यंत झालेल्या कामाचे मोजमाप करीत होता. याचवेळी सुमारे ६० ते ७० फुट उंचावरील मोठा दगड अचानक त्याच्या डोक्यावर कोसळला. या घटनेत मुस्तकिन उर्फ राजूच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन मेंदू बाहेर पडुन तो जागीच ठार झाला.
या घटनेनंतर मजुरानी आरडाओरड केली आणि घटनेची माहिती गावातील नातेवाईक आणि हर्सुल पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, उपनिरीक्षक ठोकळ, सहाय्यक फौजदार सोन्ने, हवालदार मनगटे, कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुस्तकिन उर्फ राजू चे प्रेत घाटीत हलविले. याविषयी हर्सुल ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
साईट इंचार्जला मारहाण आणि जीप फोडलीया घटनेची माहिती मिळताच डोंगराच्या बाजुला बसलेल्या साईट इंचार्ज सुब्बा रेड्डी आणि भांडारपाल मधुसूदन मेडपल्ली हे घटनास्थळी पोहोचले. तेव्हा संतप्त नातेवाईक आणि मजुरांनी त्यांना बेदम मारहाण केली. यात सुब्बा रेड्डी हे जखमी झाले. काहीनी त्यांच्या स्कार्पिओ जीप ची तोडफोड केली.