औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संवैधानिक अधिकाऱ्यांवरील आक्षेपांच्या तथ्यशोधनासाठी निवृत्त न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांच्या समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेने फेटाळल्यानंतर नव्याने नियुक्त केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे यांनी लॉकडाऊन उठल्यानंतर औरंगाबादेत येणार असल्याचे सांगितले.
विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या नियुक्तीवर काही जणांनी आक्षेप घेतला होता. त्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने निवृत्त न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांची समिती नेमली. या समितीने चौकशीअंती तीनही संवैधानिक अधिकाऱ्यांना ‘क्लीन चीट’ दिली. अहवाल मनासारखा प्राप्त झाला म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या २३ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत तो फेटाळून लावला व त्याच बैठकीत डॉ. राजेश करपे व संजय निंबाळकर या सदस्यांनी दुसरी चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. तेव्हा कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी या बैठकीच्या विषयपत्रिकेत हा विषय नाही व ऐनवेळच्या विषयावर निर्णय घेता येणार नाही, असे सांगून सदस्यांची मागणी फेटाळून लावली होती.
दरम्यान, ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. विलास खंदारे व नरेंद्र काळे या तीन सदस्यीय समितीची शिफारस केली. बहुमताने हा ठराव पारित झाला. डॉ. निमसे यांनी समितीवर काम करण्यास असमर्थता दर्शविली असती, तर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी या समितीच्या अध्यक्षपदासाठी संत बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. आर. एस. माळी यांच्या नावाचा पर्याय ठेवला होता; मात्र निमसे यांनी समितीवर काम करण्यास संमती दिली. दुसरीकडे, विद्यापीठात एक असाही मतप्रवाह आहे की, कुलसचिव डॉ. सूर्यवंशी यांनी कुलपती तथा राज्यपालांकडे आक्षेपांसंदर्भात अपील केले आहे, तर डॉ. सरवदे यांनी आपल्या नियुक्तीला घेण्यात आलेल्या आक्षेपासंबंधी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे, तर या आक्षेपासंबंधी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्तींंनी निर्णय दिल्यानंतर त्याच आक्षेपाबाबत बिगर न्यायिक व्यक्तींकडून चौकशी करता येते का.
दोन बैठकांत निकाल लावण्याचा निर्धार‘लोकमत’शी बोलताना चौकशी समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे यांंनी सांगितले की, चौकशी समितीवर काम करण्यास आपण विद्यापीठाला होकार कळविला आहे; मात्र सध्या औरंगाबादेत कोरोनाचा संसर्ग वाढत असून, लॉकडाऊनदेखील लागू करण्यात आलेला आहे. अशा काळात येणे जोखमीचे आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर पुढील महिन्यात विद्यापीठात येऊ व दोनच बैठकांमध्ये ‘फॅक्ट फायडींग’ करू. जास्त कालावधी लागणार नाही.