औरंगाबाद : पैठण रोडवरील विटखेडा येथील शिक्षिकेचे घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी तीन लाखाचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळवली. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ ते १.३० दरम्यान घडली. याप्रकरणी सातारा ठाण्यात चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
याविषयी अधिक माहिती देताना सातारा पोलिसांनी सांगितले की, विटखेडा येथील आनंद विहार हॅप्पी होम्स फेज-२ मधील रहिवासी शिक्षिका दिपाली चंद्रशेखर पाटील या १३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता शाळेत कर्तव्यावर गेल्या. त्यानंतर घरी असलेली त्यांची सासू मुलांसह भराडी (ता.सिल्लोड) येथे गावी गेली. यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. ही बाब चोरट्यांच्या नजरेतून सुटली नाही. दिपाली यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाट उचकटून आतील लॉकर उघडले आणि त्यातील ६० हजाराचे सोन्याचे गंठण, ८० हजाराचा राणी हार, ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस, १६ हजार रुपयांचे कानातील झुब्बे, ४ हजार रुये किंमतीच्या सोन्याच्या बाळ्या, २० हजाराच्या दोन सोनसाखळ्या, ८ हजााचे सोन्याचे मणीमंगळसुत्र आणि रोख रक्कम असा सुमारे तीन लाखाचा ऐवज चोरून नेला.
दुपारी दिड वाजेच्या सुमारास शिक्षिकेच्या शेजाऱ्यांना त्यांच्या दाराचे कुलूप तुटलेले आणि दार उघडे दिसले. त्यांनी या घटनेची माहिती फोनवरुन कर्तव्यावर असलेल्या दिपाली यांना कळविली. त्यांनी लगेच घरी येऊन पाहिल्यानंतर चोरट्यांनी घरसाफ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी घटनेची माहिती सातारा पोलिसांना दिली.