किरण देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कआडस : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना विजेच्या सोयीअभावी लहान बाळांसोबत अंधाराचा सामना करीत व्हरांड्यात रात्र काढण्याची वेळ आली. यामुळे संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी आरोग्य केंद्रास कुलूप ठोकले.कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बुधवारी केले होते. त्यामुळे मंगळवारी रात्रीच महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती झाल्या होत्या. आडस हे सोयीचे ठिकाण आहे म्हणून या ठिकाणी परिसरातील खेड्यांतून महिला येतात. परंतु मंगळवारी मात्र त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला आडस येथे मंगळवार पाऊस पडत होता. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाली होता. याउपरही प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाने कोणत्याही प्रकारची विजेची सोय केलेली नसल्याने या सर्व महिलांना मुलांबाळांसह आरोग्य केंद्रांच्या व्हरांड्यातच रात्र काढावी लागली.कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर सदर महिला आरोग्य केंद्रातच सात दिवस मुक्कामी असतात. हे लक्षात घेऊन आरोग्य केंद्राने सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु आडसच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा प्रकारे कुठल्याही सुविधा नसल्याने शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.पवनचक्की जमीनदोस्तप्राथमिक आरोग्य केंद्रात विजेची सोय व्हावी म्हणून म्हणून लाखो रु पये खर्च करून पवनचक्की उभारण्यात आली होती. मात्र, ती कोलमडून पडून बराच कालावधी लोटला आहे. याच्या दुरुस्तीकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष येथील रुग्णांसाठी घातक ठरु पाहत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
शस्त्रक्रियेसाठी आल्या अन् कुलूप ठोकून गेल्या
By admin | Published: June 01, 2017 12:28 AM