औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावामुळे देहदानाच्या चळवळीला ब्रेक लागला होता. मात्र, ८६ वर्षीय ज्येष्ठाचा रविवारी मृत्यू झाला. आपले देहदान व्हावे, अशी इच्छा त्यांनी कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यासाठी प्रयत्न केले. मृत्यूनंतर अँटिजन टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आली आणि देहदानाची इच्छा अखेर पूर्ण झाली.
रतनचंद कटारिया (८६, रा. वेदांतनगर) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. मरणोत्तर त्यांचे नेत्र व देह घाटी रुग्णालयास दान करण्यात आला. विजय कटारिया यांचे वडील तर डॉ. माया कटारिया यांचे ते सासरे होत. वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान महत्त्वाचे ठरते. मात्र, कोरोना प्रादुर्भाव सुरू झाला आणि देहदानाची चळवळ ठप्प झाली. गेल्या दीड वर्षात अनेकांची देहदानाची इच्छा अधुरी राहिली. रतनचंद कटारिया यांनीही देहदानाची इच्छा कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. त्यानुसार घाटी रुग्णालयास त्यांचा देहदान करण्यात आला. शिवाय नेत्रदानामुळे गरजू रुग्णाला दृष्टीही मिळणार आहे. त्यांच्या अखेरच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर अँटिजन टेस्ट करून देहदान केल्याचे डाॅ. माया कटारिया यांनी सांगितले.
कोविड टेस्ट आवश्यक
कोरोनामुळे देहदानावर परिणाम झाला. परंतु आता मृत्यूनंतर कोविड टेस्ट करून देहदान करता येत आहे. या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह असेल तर देहदान स्वीकारता येत आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डाॅ. प्रतिमा कुलकर्णी यांनी सांगितले.