छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती आता ठणठणीत होत आहे. दिवाळीनंतर जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. राज्यभरातून त्यांना सभा घेण्यासाठी आमंत्रित केले जात असल्याने जरांगे-पाटील यांनी १५ नोव्हेंबरपासून राज्यात संपर्क दौरा करण्याची घोषणा गुरुवारी केली.
जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, यासाठी राज्यातील सर्व मराठा समाजाने प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करायचे आहे. कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे.
मात्र, मुख्यमंत्री याविषयी वेगळे बोलले असल्याच्या बाबीकडे जरांगे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री जे बोलले त्याविषयी २४ डिसेंबरला बोलू. आता मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावे मिळत आहेत. यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हे आता भुजबळ यांना सहन होत नसल्याचे जरांगे म्हणाले.
दौऱ्यात कुणाकडून एक रुपया घेत नाहीमराठा समाजाचे राज्यात सुरू असलेले आंदोलन हे सर्वसामान्य मराठ्यांनी एकत्र येऊन सुरू केले आहे. या आंदोलनासाठी कोणाकडूनही एक रुपयाही घेतला जात नाही. राज्यातील अधिकारी, राजकीय नेते आणि नागरिकांनाही आम्ही आवाहन करीत आहोत की, आंदोलनासाठी कोणीही एक रुपयाही देऊ नये. एवढेच नव्हे तर याआधी कुणी दिले असेल तर त्याचे नाव आम्हाला सांगावे, असे ते म्हणाले.