औैरंगाबाद : एस. टी. महामंडळाने पंधरा जिल्ह्यांमध्ये चालक-वाहकपदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. रविवारी या पदांसाठी जिल्हानिहाय लेखी परीक्षाही घेण्यात आली. यापाठोपाठ महामंडळाने वर्ग-१ आणि वर्ग-२ चा अनुशेषही भरून काढण्याचा निर्णय घेतला असून, एकूण ६५ पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना १९ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षांपासून एस. टी. महामंडळाने रिक्त पदे भरलीच नव्हती. अनेक महत्त्वाच्या पदांचा अतिरिक्त कार्यभार अधिकाऱ्यांवर सोपवून कामकाज करण्यात येत होते. बेरोजगारीचे प्रमाणही वाढू लागल्याने शिवसेना-भाजप युतीवर तरुणांकडून कडाडून टीकाही करण्यात येत होती. निवडणुकांच्या तोंडावर एस.टी.मध्ये व्यापक प्रमाणात पदे भरण्यात येत आहेत. १५ जिल्ह्यांमध्ये चालक-वाहक पदांसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. ४ हजार २४२ जागांसाठी हजारो तरुणांनी अर्ज दाखल केले.
औरंगाबाद जिल्ह्यात फक्त २४० जागा असताना १७५३ उमेदवारांनी परीक्षा दिली. बेरोजगारांची टक्केवारी यावरून लक्षात येते. आता एस. टी. महामंडळ एकूण ६५ विविध वर्ग-१, वर्ग-२ मधील पदे भरणार आहे. यंत्र अभियंता-११, विभागीय वाहतूक अधिकारी- ८, उपयंत्र अभियंता-१२, लेखाधिकारी-२, भांडार अधिकारी-२, विभागीय वाहतूक अधिकारी-१२, सहायक यंत्र अभियंता-९, सहायक विभागीय लेखा अधिकारी- २, विभागीय सांख्यिकी अधिकारी-७ आदी पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील एकूण २० जागा आहेत. उर्वरित जागा आरक्षणानुसार भरण्यात येणार आहेत. महिलांसाठी ३० टक्केआरक्षण असून, खेळाडूंसाठी ५ टक्केआरक्षण राहील. पात्र उमेदवारांना नियमानुसार प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच नेमणूक देण्यात येईल.