औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, औरंगाबादच्या कुलगुरूपदी तेलंगणातील नलसार विधी विद्यापीठ, हैदराबाद येथे १४ वर्षांपासून कार्यरत असलेले डॉ. कोल्लुरू वेकंटा सोमनाथा सर्मा (के.व्ही.एस.) यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती विधि विद्यापीठाच्या कुलपती सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आर. बानुमती यांनी केली.
डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी डिसेंबर २०१८ मध्ये तामिळनाडूतील एका विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्यामुळे औरंगाबादच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभारी पदभार डॉ. जे. कोडय्या यांच्याकडे देण्यात आला होता. पूर्णवेळ कुलगुरूपदासाठी प्रक्रिया सुरू होती. यासाठी नेमलेल्या शोध समितीने अर्ज मागवून १४ जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतीनंतर चार जणांच्या नावांची शिफारस कुलपती न्या. आर. बानुमती यांच्याकडे केली. या चौघांच्या मुलाखती घेतल्यानंतर बानुमती यांनी मागील महिन्याच्या शेवटी कांचनवाडीतील विधि विद्यापीठाच्या इमारत बांधकामाच्या कोनशिला समारंभाला हजेरी लावली होती. तेव्हाच नव्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र बुधवारी मुंबई झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत डॉ. सर्मा यांची कुलगुरू पदी निवड करण्यात आली. डॉ. सर्मा हे तेलंगणातील नलसार विधि विद्यापीठातील कंझ्यूमर अॅण्ड कॉम्पेटेटिंव्ह विभागाचे विभागप्रमुख आहे. याशिवाय त्यांनी नलसार विधि विद्यापीठातील विविध समित्यांसह राष्ट्रीय पातळ्यांवरील समित्यावरही काम केले आहे.
औरंगाबादच्या विधि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली. हा आनंददायी क्षण आहे. औरंगाबादच्या विधि विद्यापीठाच्या कार्यकारी आणि विद्यापरिषदेचा सदस्य म्हणून कार्य केले आहे. या विद्यापीठाची उभारणी करत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. कुलगुरूपदाचा पदभार या महिन्याच्या शेवटी २९ ऑगस्ट रोजी घेणार आहे. - डॉ. के.व्ही.एस.सर्मा, कुलगुरू, विधि विद्यापीठ