औरंगाबाद : लोकसभा निवडणुका संपताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये दुष्काळ पाहणीवरून स्पर्धा लागली आहे. जिल्ह्यातील दुष्काळाने रौद्ररूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळ पाहणीचा सपाटा सध्या सुरू झाला आहे. आचारसंहिता असल्यामुळे प्रशासनाला सूचना करण्याव्यतिरिक्त ठोस निर्णय घेण्यात अडचणी येत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे पाहणी दौरे वांझोटे ठरल्याचे दिसते आहे, तर दुष्काळ नियोजनात राज्यकर्ते अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होतो आहे.
मराठवाड्यात दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. शेतकरी आणि नागरिकांच्या प्रति आस्था असल्याचे दाखविण्यासाठी हे दौरे आयोजित करण्यात येत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी पाहणी करून आठवडा होत नाही, तोवर भाजपच्या मंत्र्यांनीदेखील बुधवारी चारा छावण्या पाहून दुष्काळी आढावा घेतला. काँग्रेसचे पथकही जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणीसाठी बुधवारी मैदानात उतरले.
जिल्ह्यातील पर्जन्यमान, प्रकल्पातील पाणीसाठा, पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा, टँकर, विहिरींचे अधिग्रहण, पाणीपुरवठा, चारा छावणी, आदींबाबत प्रशासनामार्फ त करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती कागदोपत्री अपडेट असली तरी शेतकऱ्यांच्या पीक विमा, दुष्काळी अनुदान, खरीप हंगामातील मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे.
पालकमंत्र्यांच्या सूचना कागदावरचजिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६ व ७ मे रोजी ग्रामीण भागात दौरे केले. त्यांनी वैजापूर, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद तालुक्यांत पाहणी केली असता शेतकऱ्यांनी पीक विम्यासह पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. चारा, पाणी, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी पाहणीअंती केल्या होत्या. पालकमंत्र्यांनी ज्या सूचना केल्या होत्या, त्याबाबत प्रशासनाने काय अंमल केला, याची माहिती बुधवारी त्यांच्या स्वीय सहायकांनी जाणून घेतली.
मुख्यमंत्री, पालक सचिवांकडून आढावामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ मे रोजी जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधून दुष्काळ परिस्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पालक सचिवांना दुष्काळ उपाययोजनांच्या अनुषंगाने पाठविले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दुष्काळ निवारणासंदर्भात जिल्ह्यातील सरपंचांनी तक्रारी, समस्या मांडल्या.४त्या समस्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे प्राधान्याने पालन करावे. तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना जिल्ह्याचे पालक सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला केल्या.
पाणीपुरवठामंत्रीही दुष्काळ दौऱ्यावर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील चारा छावणीला पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपकडून बुधवारी सकाळी ९ वा. भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.शहरातील पंचतारांकित हॉटेलात मुक्काम करून दोन चारा छावण्यांना त्यांनी भेटी दिल्या. शासकीय कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याच्या तक्रारी खोत यांच्याकडे शेतकऱ्यांनी मांडल्या. पीक विमा, दुष्काळी अनुदान, रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत शेतकऱ्यांनी कैफियत मांडली.