औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी शहरातील देवगिरी कॉलेजचे उपप्राचार्य व जलतज्ज्ञ प्रोफेसर डॉ. अशोक तेजनकर यांची निवड राज्यपाल कार्यालयाने शुक्रवारी (23 फेब्रुवारी) सायंकाळी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या प्र- कुलगुरूपदासाठी कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी 27 सप्टेंबर 2017 रोजी राजभवनात तीन जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यातील डॉ. तेजनकर यांची नियुक्ती तब्बल पाच महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर करण्यात आली आहे.
डॉ. तेजनकर यांना शिक्षण, प्रशासन, भूगर्भ संशोधन क्षेत्रातील 28 वर्षांचा अनुभव आहे. तसेच पाण्याच्या क्षेत्रातील विविध संशोधन प्रकल्प, भारत सरकारच्या स्किल इंडिया प्रकल्पात सहभाग, महाराष्ट्र-इस्राईल जलनियोजन समितीवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती केलेली आहे. या नियुक्तीमुळे विद्यापिठाच्या प्रशासनाची बिघडलेली घडी बसण्यास मदत होणार आहे.