औरंगाबाद : एसटी महामंडळातर्फे औरंगाबाद जिल्ह्यातील चाळीस वर्षांवरील चालक-वाहकांची सोमवारपासून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दोन दिवसांत दोनशेवर चालक-वाहकांची तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत बहुतांश चालकांना गुडघे, पाठ, कंबर, मानेसह सांधेदुखी, उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे समोर आले. अवेळी जेवणाने अपचन, अॅसिडिटीचे दुखणेही चालक-वाहकांमध्ये आढळून आले आहे.
एसटी महामंडळातील ४० वर्षांवरील चालकांची प्रत्येक वर्षी, तर ४० वर्षांवरील वाहकाची दोन वर्षांतून एकदा आरोग्य तपासणी करून शासनाला माहिती सादर करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील चालक-वाहकांची १६ एप्रिलपासून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. डॉ. मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भारत खोसे, डॉ. शाहेद गफूर पटेल आणि त्यांच्या पथकाकडून ही तपासणी सुरू आहे. पहिल्या दिवशी सिडको बसस्थानकातील, तर मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानकातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, रक्तचाचणी, ईसीजी आदी तपासण्या करण्यात येत आहेत. दोन दिवसांत दोनशेवर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. एसटी खेड्यापाड्यासह अतिदुर्गम भागापर्यंत जाते. प्रवासी सेवेसाठी तासन्तास बस चालवावी लागते.
कर्तव्य बजावताना जेवणाची वेळही पाळली जात नाही. यातून चालक-वाहकांना आरोग्याच्या तक्रारी भेडसावतात. बहुतांश कर्मचाऱ्यांचे सारखेच आजार असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळत आहे. कामाच्या वेळामुळे मानसिक ताणाचे प्रमाणही अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्या दूर करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय तपासणीचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
चाळिशीवरील ७९८ चालक-वाहकजिल्ह्यात मध्यवर्ती, सिडको बसस्थानकासह वैजापूर, गंगापूर, पैठण, कन्नड, सिल्लोड, सोयगाव या ठिकाणी एकूण ७९८ चालक-वाहक आहेत. यामध्ये चालकांची संख्या सर्वाधिक ५६१, तर वाहकांची संख्या २३७ आहे. २० एप्रिलपर्यंत या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
महामंडळाला अहवाल देणारचालक-वाहकांची तपासणी केली जात असून, प्राथमिक तपासणीत रक्तदाब, सांधेदुखी, अपचन, अॅसिडिटीचा त्रास असल्याच्या तक्रारी अधिक आहेत. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर चालक-वाहकांमधील आजार आणि नेमके प्रमाण समोर येईल. आरोग्य तपासणीचा अहवाल महामंडळाला सादर करण्यात येणार आहे.- डॉ. मिलिंद देशपांडे