पंचनामे होऊन चार महिने झाले तरी दुष्काळग्रस्तांना कसलीही मदत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 02:23 PM2019-05-17T14:23:55+5:302019-05-17T14:27:17+5:30
काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख आमदार बसवराज पाटील यांनी सांगितले.
औरंगाबाद : दुष्काळाकडे शासनाचे संपूर्ण दुर्लक्ष होत असून, शासनाची कसलीही मदत दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचलेली नाही. कामे नाहीत म्हणून लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. वाळलेल्या फळबागांचे पंचनामे होऊन चार-चार महिने झाले तरी शासनातर्फे कसलीही मदत दिली गेली नाही, असे काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख आमदार बसवराज पाटील यांनी सांगितले.
औरंगाबाद व जालना जिल्ह्यांचा दुष्काळी पाहणी दौरा करून आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले होते. फळबागांच्या नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात यावी, मागेल तेथे चारा छावणीला त्वरित परवानगी देण्यात यावी व प्रतिजनावरांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी, चारा छावणीसाठी डिपॉझिटची अट रद्द करण्यात यावी व छावणीवर ४ टक्के जीएसटी कर व २ टक्के टीडीएस व टॅगिंगची अट, आॅनलाईन प्रक्रियेची अट रद्द करण्यात यावी, ड्रीप व ठिबकचे प्रलंबित अनुदान त्वरित देण्यात यावे, जायकवाडीचे पाणी हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यांमध्ये त्वरित सोडण्यात यावे, ब्रम्हगाव लिफ्ट टप्पा नं. २ द्वारे खेर्डा प्रकल्पात पाणी देण्याची योजना त्वरित पूर्ण करण्यात यावी, मागणी केलेल्या गावात पाण्याचे टँकर त्वरित सुरू करण्यास मंजुरी देण्यात यावी, दुष्काळी भागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींना सतर्क राहण्यास सांगावे, खरीप पिकांसाठी बी-बियाणे, खते मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत, रोहयोची कामे त्वरित चालू करण्यात यावीत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज विनाअट त्वरित माफ करण्यात यावे, खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना विनाअट तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
प्रदेश काँग्रेसने आ.बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही विभागीय समिती स्थापन केली आहे. पत्रपरिषदेनंतर ही समिती बीड जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणीसाठी रवाना झाली. पत्रपरिषदेस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, माजी आमदार सुरेश जेथलिया, समन्वयक भीमराव डोंगरे, विलासराव औताडे, डॉ. कल्याण काळे, शहर कार्याध्यक्ष मीर हिदायत अली, संतोष भिंगारे, डॉ. पवन डोंगरे, किसान काँग्रेसचे हिशाम उस्मानी, तकी हसन, वसंतराज वक्ते आदींची उपस्थिती होती.
मदतीचा हात...
कन्नड तालुक्यातील गारडा गावात काही दिवसांपूर्वी आग लागल्याने चार घरे जळाली होती. ती शेतकऱ्यांची होती. किसान काँग्रेसचे राष्ट्रीय सहसमन्वयक मो. हिशाम उसनी यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. आज या शेतकऱ्यांना बसवराज पाटील यांच्या हस्ते एकूण ३२ हजार रुपयांची मदत करण्यात आली. या शेतकऱ्यांना घरकुल योजनेत घरे देण्यात यावीत, शेतीची अवजारे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.