औरंगाबाद : जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील ‘इंदिरा गांधी उठावानंतर’ या देशातील राजकारणात जातीयवादी पक्षांचा शिरकाव झाला आणि या जातीय राजकारणाला पाठिंबा मिळत गेला. आता तर हे राजकारण या देशात राज्यघटना वगैरे काही आहे याची पर्वा न करता सुरू आहे. ‘मनुस्मृती’ प्रमाण मानून सुरू असलेले हे राजकारण देशाला फॅसिझमकडे नेत आहे, असा स्पष्ट आरोप आज येथे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी केला. मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात अॅड. भगवानराव देशपांडेलिखित ‘विचारमंथन’ या ग्रंथाच्या विमोचनप्रसंगी ते बोलत होते. प्रसिद्ध पत्रकार व विचारवंत कुमार केतकर यांनी या ग्रंथाच्या अनुषंगाने जगभरातील बदलांचा वेध घेत भाष्य केले. सावंत म्हणाले की, हिटलर हाच यांचा नायक आहे. तोच मार्ग पत्करून या देशात फॅसिझम आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्माच्या मार्गाने फॅसिझम येईल, असे भाकीत पं. नेहरू यांनी केले होते. ते इतक्या लवकर येईल, असे वाटले नव्हते. दुर्दैवाने या फॅसिझमचा मुकाबला करण्यासाठी आशास्थान नाही. डाव्या चळवळीतील मंडळी भांडवलशाहीचे गोडवे गात आहे. विरोधी शक्तीला आज नेतृत्व नाही. कन्हैयाच्या रूपाने तरुणांमध्ये उत्साह निर्माण होत आहे. अमेरिकेतसुद्धा लोकशाही नाही. तेथील लोकशाहीचे रूपांतर धनिकशाहीत झाले आहे. भारतातसुद्धा ८२ टक्के खासदार धनिक आहेत. १८२ खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. म्हणजे निवडून येण्यासाठी एकतर धनिक असावे लागते, नाही तर गुंड असावे लागते, असाच याचा अर्थ झाला. मागच्या लोकसभा निवडणुकीत २३ हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे एका अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.राज्यसभा तर श्रीमंतांचा क्लब (अड्डा) झाला आहे. नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशी पळून गेलेला विजय मल्ल्या हा राज्यसभेचा सदस्य आहे, याकडे सावंत यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रारंभी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. भालचंद्र कांगो, जयश्री गायकवाड, उदय बोपशेट्टी, उषा देशपांडे, कॉ. प्रकाश बनसोडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. जयश्री सावंत, शारदा साठे यांची मंचावर उपस्थिती होती. अॅड. भगवानराव देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. कॉ. राम बाहेती यांनी सूत्रसंचालन केले, तर कॉ. भास्कर लहाने यांनी आभार मानले.सरकारला धर्मनिरपेक्षता मान्य नाही...आमचे संविधान म्हणजे लोकशाही, समाजवाद निर्माण करण्याचा जाहीरनामा होय आणि हा जाहीरनामा सर्वांवर बंधनकारक आहे. लोकशाही टिकविण्यासाठी जात, धर्म, वंश, भाषा, लिंग, असा भेदाभेद चालत नाही. आजच्या सरकारला समाजवाद व धर्मनिरपेक्षता मान्यच नाही. देशात घटनाच नाही या पद्धतीने ते कारभार करीत आहेत. घटनेची पायमल्ली करूनच महाराष्ट्रातील सरकार कारभार करीत आहे. आवाजी मतदानाने कधीही विश्वासदर्शक ठराव संमत होत नसतो. या सरकारने अजूनही कायद्याच्या चौकटीत राहून विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतला नाही. केंद्र सरकारच्या व्यापारी व संरक्षण करारांमुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येत आहे. ४भारत देश भांडवलशाही अमेरिकेची वसाहत बनत आहे. हा देश फक्त एका धर्मीयांचा आहे असे ‘यांना’ वाटत आहे. त्यामुळे इतर धर्मीयांवर हल्ले वाढले आहेत, असेही यावेळी पी. बी. सावंत यांनी नमूद केले.