कन्नड : गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कन्नड -औरंगाबाद रस्त्यावरील कमानी नाल्याजवळ गट नं.१६७/१ मधील विहिरीत मृतदेह असल्याची खबर कारभारी शंकर थोरात (रा.कनकावतीनगर) यांनी गुरुवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात दिल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करून सपोनि. बालाजी वैद्य,पोउपनि. सतीश दिंडे, पोना. बोंदरे यांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह कुजल्याने ओळख पटत नव्हती, मात्र त्याच्या खिशात मोबाईल सापडल्याने त्यातील सीमकार्डच्या सहाय्याने त्याचा तपास लागला. शुक्रवारी सकाळी मयताच्या पत्नीसह नातेवाईकांनी ओळख पटविली. मयताचे नाव महेंद्र उत्तम केदार (३८) असून तो धस्केबर्डी ता. चाळीसगाव जि. जळगाव येथील रहिवासी आहे. सदर इसम २९ एप्रिल २०१८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास कपडे घेऊन येतो असे सांगून घरातून गेला तो परत आलाच नाही, अशी खबर मयताच्या पत्नीने मेहुणबारा ता.चाळीसगाव पोलीस ठाण्यात बुधवारी दिली होती.उत्तरीय तपासणीत गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्यावरुन सरकारतर्फे फौजदार सतीश दिंडे यांनी फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनि.बालाजी वैद्य करीत आहेत. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे. मयताची आर्थिक परिस्थिती गरीबीची असून तो बकºया चारण्याचे काम करीत होता. त्याचा खून का झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.
खून करुन मृतदेह विहिरीत फेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:45 AM