ऑनलाइन लोकमतहतनूर, दि. 10 - औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित शिवना नदीवरील टापरगाव पूल जड वाहतुकीसाठी बुधवारपासून खुला करण्यात आल्याने प्रवासी व वाहनधारक कमालीचे आनंदी झाले आहेत. जवळपास सात महिन्यांपासून सतत चर्चेत असलेला हा पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक असल्याने यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तीन महिन्यांपासून या पुलाचे मजबुतीकरण आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. हा पूल बंद झाल्याने सर्वांचीच मोठी गैरसोय झाल्याने अनेकदा आंदोलनेही झाली.या पुलाच्या दुरुस्तीच्या कालावधीत धुळे, चाळीसगाव मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या बस आणि जड वाहने देवगाव रंगारीमार्गे, नांदगाव, चाळीसगावकडे वळविण्यात आल्याने या वाहनांचा जवळपास ४० किमी चा अतिरिक्त फेरा वाढला होता. यामुळे प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ बसत होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर या पुलाची दुरुस्ती होऊन बुधवारी खा. चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांच्या हस्ते या पुलाचे औपचारिक उद्घाटन होऊन हा पूल सर्वच जड वाहने व एसटी बससाठी खुला करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपमहाव्यवस्थापक महेश पाटील, शिवसेना उप तालुकाप्रमुख शिवाजी थेटे, नगरसेवक बंटी सुरे, वाहतूक शाखेचे स. पो. नि. नामदेव चव्हाण, वाहतूक निरीक्षक श्रीहरी काळे, सतीश खडेकर, दत्ता मोहिते, शरद सिरसाठ आदींसह या परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
दीर्घ प्रतीक्षेनंतर औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील टापरगाव पूल खुला
By admin | Published: May 10, 2017 8:58 PM