औरंगाबाद : दारू आणण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने कांचनवाडी येथे रविवारी रात्री महेश दिगंबर काकडे या तरूणाचा खून करण्यात आल्याची बाब गुन्हे शाखा आणि सातारा पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली. महेशच्या खून प्रकरणी पोलिसांनी सोमवारी दुपारी दोन संशयित मारेकऱ्यांना अटक केली.
विकास राहटवाड उर्फ विक्या आणि संदीप उर्फ गुर्ज्जर धारासिंग मुळेकर (दोघे रा. कांचनवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महेश आणि आरोपी हे परस्परांचे मित्र आहेत. ते नेहमी एकत्र दारू पित असत. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महेश आणि त्याचा मित्र राहुल बेडके हे वर्षा वाईन शॉप समोरील अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर दारू पिण्यासाठी गेले. तेथे विकास आधीच उपस्थित होता. यावेळी तिघांनी दारु पिल्यानंतर काही वेळाने तेथे आरोपी संदीप उर्फ गुर्ज्जर आला. चौघांनी सुमारे तासभर दारू पित गप्पा मारल्या. यावेळी आणखी दारू पाहिजे, असे म्हणून आरोपींनी महेशकडे पैशाची मागणी केली. महेश आणि राहुल यांना दारूची नशा जास्त झाली होती.
हेही वाचा - जायकवाडी धरण @ ६० टक्के; धरणात ३२,५९१ क्युसेसने आवक वाढली
यावेळी महेशने आरोपींना दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात भांडण सुरू झाले. यावेळी विकासने महेशचे केस पकडून त्याला स्लॅबवर जोरजोराने आदळून गंभीर जखमी केले. तर संदीपने त्याच्या डोक्यात वीटाने मारहाण करण्यास सुरवात केली. राहुलने त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही त्यांनी दोन फटके दिल्याने तो बेशुद्ध पडला. यात महेशच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन तो जागीच ठार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याविषयी मृताच्या वडिलांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सहायक निरीक्षक सुनील कराळे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके, हवालदार धुळे यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली.
मृताच्या खिशातील पैसे काढून आणली दारूमहेशचा खून केल्यानंतर आरोपींनी त्याच्या खिशातील पाचशे रुपये काढून घेतले. या पैशातून त्यांनी दारू विकत आणली आणि घटनास्थळ असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर बसून अन्य मित्रांसोबत ते मनसोक्त दारू पिले.
मारायचे होते एकाला मारले दुसऱ्यालामहेशचा खून केल्यानंतर सायंकाळी नवीन चार-पाच मित्र व ते मारेकरी त्या इमारतीच्या तळमजल्यावर बसून दारु पीत बसले. तेव्हा दारूच्या नशेत असलेला विकास बडबड करीत खुनाबद्दल सांगता होता. तेव्हा संदीपला फसविण्यासाठी विकास त्याचे नाव घेत असावा, असे संदीपचा मित्र अविनाशला वाटले म्हणून त्याने स्वत:च्या मोबाईलवर विकासची रेकॉर्डिंग केली. यावेळी अविनाशने विचारले की, तू महेशला कसे मारले, तू संदीपला का फसवत आहेस. तेव्हा विकास उत्तर देत असतानाच संदीप मध्येच बोलला की, मारायचे होते फिट्या देवकतेला. पण मारले महेश्याला. संदीपचा आवाज त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला आणि पोलिसांना एक चांगला पुरावा मिळाला.
हेही वाचा - नियम, अटीशर्थी धाब्यावर; शहरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा ठेका शिवसेनेला !