औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरातील बनेवाडी भागात राहणाऱ्या मुकुंद कुमावत (३२) याला त्याच्या सावत्र भावाने दोनशे रुपये मागितले. मुकुंदने त्याला शंभर रुपयेच देऊन बोळवण केली. हा राग मनात धरून त्याने चक्क मुकुंदच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. घरातच जळून त्याचा मृत्यू व्हावा म्हणून घरालाही आग लावून दिली. या घटनेत मुकुंद ५० टक्के जळाला असून, घाटी रुग्णालयात त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भदरगे यांनी सांगितले की, बनेवाडी येथील म्हसोबा मंदिराजवळ मुकुंद आपल्या सावत्र भावासह अनेक वर्षांपासून राहत आहेत. त्याची पत्नी काही वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली आहे. मिस्तरी काम करून मुकुंद उदरनिर्वाह करतो. शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी मुकुंद कामाला गेला. सायंकाळी घरी परतला. जेवण करून थोडीशी दारू पिऊन झोपी गेला. रात्री नऊ वाजता त्याच्यासोबत राहणारा सावत्र भाऊ सोमेश कुमावत घरी आला. त्याने मुकुंदला २०० रुपये मागितले. त्याने सोमेशला १०० रुपये दिले. हा राग मनात धरून त्याने चक्क शिवीगाळ सुरू केली. जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिली.
या घटनेनंतर मुकुंद कुमावत झोपी गेला. रात्री १०.३० वाजता अचानक सोमेश याने मुकुंदच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. घरालाही आग लावली. घराची कडीही बाहेरून लावली. आग पाहून मुकुंद झोपेतून जागा झाला. अर्ध्याहून अधिक अवस्थेत तो जळालेला होता. त्याने आरडाओरड केली असता, परिसरातील नागरिक जमा झाले. त्याच्या आत्याचा मुलगा योगेश छल्लारे याने चादर टाकली. घटनास्थळी पोलीसही पोहोचले. पोलिसांनीच मुकुंदला घाटीत दाखल केले. वॉर्ड क्रमांक २२/२३ मध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वेदांतनगर पोलीस ठाण्यात ३०७, ४३६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल अकरून सोमेशला अटक केली.