वाळूज महानगर (औरंगाबाद ) : क्रिकेट खेळल्यानंतर मित्रासोबत तलावात पोहण्याचा बेत एका तरुणाच्या जीवावर बेतला. शनिवारी दुपारी घाणेगावच्या पाझर तलावात उतरलेल्या ओम संतोष गुंजकर (वय १८, रा. रांजणगाव) या तरुणाचा अंत झाला.
क्रिकेट खेळल्यानंतर उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने मित्रांनी लगतच्या पाझर तलावात पोहण्याचा बेत आखला. ओम व त्याचा लहान भाऊ जगदीशही पोहण्यासाठी गेले. ओम व इतर दोघे तलावात आतपर्यंत गेले. ओम गटांगळ्या खाऊ लागल्याने मित्रांनी आरडाओरडा करून त्यास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ओम खोल पाण्यात बुडाला. लगतच्या कंपन्यांतील कामगार व प्रेम फोलाने, आकाश सरोदे, प्रताप घुगे, रवी हरणे या पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्यात उड्या घेतल्या; पण ओम सापडला नाही. माहिती मिळताच फौजदार राजेंद्र बांगर तसेच वाळूज अग्निशमन दलाचे जवान आले. मात्र, जवानांकडे सुरक्षा साधने नसल्याने त्यांनी तलावात उतरण्यास असमर्थता दर्शविली. नंतर पदमपुरा येथील अग्निशमन दलाचे मोहन मुंगसे, हरिभाऊ घुगे, अब्दुल अजीज, संजय कुलकर्णी, संग्राम मोरे, शिवसंभा कल्याणकर, सचिन शिंदे, अशोक पोटे, अतिश शेख आदींनी सायंकाळी शव तलावाबाहेर काढले.
कुटुंबाचा आक्रोशओमचे आई-वडील वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतात. ओमने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. तो बुडाल्याची माहिती मिळताच त्याचे आई-वडील व लहान भावांनी घटनास्थळ गाठून हंबरडा फोडल्याने अनेकांचे डोळे पाणावले होते.