वाळूज महानगर : वाळूज येथे गुरुवारी दुपारी पाऊस पडल्यानंतर एका शेत जमिनीतुन अचानक धुराळे लोळ बाहेर पडल्यामुळे शेतकरी कुटुबात चांगलीच खळबळ उडाली होती. पाऊस पडल्यानंतर डोंगर-दऱ्यात व शेतात असे प्रकार घडत असल्याचा दावा महसुल विभागाने केला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, उदय रावसाहेब चव्हाण यांची वाळूजच्या गट नंबर २३२मध्ये मध्ये शेत जमिन आहे. गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास या परिसरात पावसाला सुरवात झाली होती. अर्ध्या तासानंतर पाऊसाचे उघडीप दिल्यावर या शेतातुन अचानक धुराचे लोळ बाहेर येऊ लागले.
शेतवस्तीवर वास्तव्यास असणाºया चव्हाण कुटुंबियांना या धुराचे लोळ दिसतात त्यांनी लगतच्या शेतकरी व वाळूज सज्जाचे तलाठी अशोक कळसकर यांच्याशी संपर्क साधुन या प्रकाराची माहिती दिली.
ही माहिती मिळताच तलाठी कळसकर, संतोष कुंजारे, गणेश लिंबोरे, उदय चव्हाण, राहुल चव्हाण आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तास-दिड तासानंतर या धुळाचे लोळ बंद झाल्यामुळे चव्हाण कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, कडक उन्हामुळे जमिन तापुन पाऊस पडल्यानंतर असे प्रकार घडत असल्याचा दावा तलाठी कळसकर यांनी केला आहे.