औरंगाबाद : अलीकडे वीज बिलांची सक्तीने वसुली केली जाते, त्याच पद्धतीने महावितरणने ग्राहकांना सुविधाही दिल्या पाहिजे. मागील आठ-दहा दिवसांपासून शहरात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. यासंदर्भात कल्पना देण्यासाठी ग्राहकांनी दूरध्वनी केला, तर अधिकारी-कर्मचारी समोरून प्रतिसाद देत नाहीत. रात्रीच्या वेळी नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी बंद करून ठेवले जातात. एकीकडे ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार करतात, तर दुसरीकडे त्यांच्या आवाहनाला त्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून हरताळ फासला जात असल्याचे विदारक चित्र सध्या शहरात पाहावयास मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील तापमान ४१ अंशांजवळ पोहोचले आहे. उकाड्यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. यासंदर्भात आतापर्यंतच्या दोन शुक्रवारी महावितरणने शहर विभाग-१ व विभाग-२ मध्ये वीजपुरवठा बंद ठेवून दुरुस्तीची कामे हाती घेतल्याचा महावितरणने दावा केला आहे; परंतु असे असले तरीही रात्रंदिवस विजेचा लपंडाव सुरूच आहे.
विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला, तर ‘लोड वाढला आहे. वादळी वारा, पावसामुळे वाहिन्यांवर झाडे कोसळत आहेत. इन्सुलेटर फुटतात’, असे उत्तर देऊन ते जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सतत सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे अनेक ठिकाणी घरातील फ्रीज, पंखे, टीव्ही आदींसह अन्य उपकरणे जळण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यास जबाबदार कोण, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटल्या आहेत. रात्री-बेरात्री वीज गेल्यास नागरिकांना उकाड्यातच रात्र काढावी लागते. पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना म्हणून महावितरणने झाडांच्या फांद्यांची छाटणी केली.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्तमहावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल दुुरुस्तीची कामे करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे वाळूज महानगरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. सिडको वाळूज महानगरात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या अभियंत्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.