पैठण : सूर्यग्रहण मोक्षकाळा नंतर परंपरेनुसार गोदावरीचे स्नान करण्यासाठी गुरुवारी शहरातील गोदावरीच्या विविध घाटावर नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान दोन दिवसापूर्वी गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने भाविकांची आज गैरसोय झाली नाही.
सूर्यग्रहण संपल्यानंतर हजारो भाविकांनी गोदास्नान करून पूजाअर्चा केली. गोदावरीच्या पात्रात ग्रहण काळात अनेक नागरिकांनी पाण्यात तीन तास उभे राहून पूजाविधी केली. दे दान सुटे ग्रहण यानुसार आज अनेकांनी गोदाकाठावर गरीबांना विविध स्वरूपात दान करीत सूर्यग्रहणाचे पुण्य पदरात पाडून घेतले.कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने दशिण काशी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पैठण नगरीत हजारो महीला पुरुष भाविकांनी पवित्र गोदावरीनदीत स्नान करण्यासाठी गर्दी केल्याने गोदाकाठ फुलून गेले होते.
आज ग्रहण सुटेपर्यंत शहरातील सोने, चांदीच्या दुकानासह बऱ्याच दुकाना बंद होत्या. दरम्यान गोदावरी तीरावर दररोज शेकडो दशक्रिया विधी पार पडतात मात्र आज ग्रहण असल्याने ग्रहणाच्या वेळेत दशक्रिया विधी बंद होत्या. ग्रहण संपल्यानंतर दशक्रिया विधीला सुरुवात करण्यात आली.