छत्रपती संभाजीनगर : भरधाव जाणाऱ्या ४०७ टेम्पोने बुधवारी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास गोलवाडी फाट्यावर अचानक वळण घेतले. त्यामुळे एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यातील शिपाई स्वप्नील महेंद्र औचरमल (वय २५) टेम्पो वाहनावर धडकले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
पोलिसांनी धडक देणारे वाहन आणि चालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरा मृतदेह घाटी रुग्णालयात आणण्यात आला.स्वप्नील औचरमल वडिलांच्या अकाली निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर ५ मे २०१९ मध्ये पोलिस दलात भरती झाले होते. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात ते चालक म्हणून कार्यरत होते. बेगमपुरा भागातील हनुमान टेकडी येथे ते वास्तव्यास होते. बुधवारी रात्री आपले कर्तव्य बजावल्यानंतर ते मोटारसायकलवर (एमएच २० सीझेड ००७६) घरी जात होते. गोलवाडी फाट्याजवळ टेम्पो (एमएच २० एटी ४८३२) चालकाने अचानक रस्त्याच्या बाजूला वाहन घेतले. पाठीमागून येणारे औचरमल त्यावर धडकले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. रक्तस्राव होऊ लागला. औचरमल यांना सहायक उपनिरीक्षक पेदावाड यांनी त्वरित रिक्षातून एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह घाटीत आणण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, इयत्ता सहावीत शिकणारा भाऊ आहे. ते अविवाहित होते.
मिठाई वाहनालाचबुधवारी ठाण्यात पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई, भेटवस्तू दिल्या. स्वप्नील मिठाई, वस्तू घेऊन घरी जात होते. अपघातस्थळी वाहनाला सर्व साहित्य जशेच्या तसेच होते. हे पाहून उपस्थितांचे मन हेलावले.