- संजय जाधवपैठण ( औरंगाबाद): बॉयफ्रेंडसाठी भिडलेल्या दोन अल्पवयीन मुलीची फ्रीस्टाईल कुस्तीची घटना ताजी असताना बुधवारी पुन्हा बस्थानक परिसरातील काळीपिवळी टी पॉंईटवर चार महिला आपसात भिडल्या. अल्पवयीन व विद्यार्थी असल्याने पहिल्या प्रकरणात पोलिसांनी मुलींना समज दिली मात्र सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याचा गुन्हा महिलावर दाखल केला आहे.
महिलांनी सार्वजनिक ठिकाणी घातलेल्या गोंधळाने पैठण शहरात सध्या चर्चेला उधान आले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पैठण शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या काळी पिवळी पॉईंटवर बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चार महिलांच्या आपसात वाद सुरू झाला, बघता बघता वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. महिलांनी एकमेकीचे केस ओढत बराच वेळ गोंधळ घातला.
भर रस्त्यावर सुरू असलेली महिलांची हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प पडली. महिलांची भाषा वेगळीच असल्याने नेमके वादाचे कारणही कुणाला समजून येत नव्हते. यामुळे मध्यस्थी कुणी करण्याचा प्रयत्न केला नाही. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस कॉन्स्टेबल विनायक आडे यांनी याबाबत पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना माहिती दिली . तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, महिला उपनिरीक्षक स्वाती लहाने, जमादार सुधीर ओव्हाळ, जीप चालक भाऊसाहेब तांबे घटनास्थळी पोहोचले गोंधळ घालणाऱ्या महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. याबाबत पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या महिलांवर सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.
दरम्यान, या चारही महिला एका ठेकेदाराकडे लेबर म्हणून काम करतात. यातील दोघींनी दुसऱ्या दोघीच्या नावावर ठेकेदाराकडून पैसे आणले व त्यांना दिलेच नाही. यावरून चारही महिलात वाद सुरू होता असे पोलीसांना त्या महिलांनी सांगितले.