छत्रपती संभाजीनगर : दोन शेजाऱ्यांमधील वादात मद्यस्थीसाठी गेलेल्या गणेश मारुती राऊत (२८, रा. साईनगर, गुरुदत्तनगरजवळ, गारखेडा) या तरुणाची चाकूने निर्घृण हत्या झाली. मंगळवारी पुंडलिकनगरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर मुख्य मारेकरी सागर विक्रम केसभट (पाटील) याने बायजीपुऱ्यातून ८०० रुपयांच्या नशेच्या गोळ्या विकत घेऊन नशा केली. थंड डोक्याने फेसबुक प्रोफाइलही ‘प्रायव्हेट’ करून ‘डीपी’ काढून टाकला.
खुनाच्या या घटनेने पुंडलिकनगर परिसर पुन्हा दहशतीखाली गेला आहे. सोमवारी रात्री १०:४० वाजता प्रीती मुळे (रा. गुरुदत्तनगर, गारखेडा) यांचे घरासमोर राहणाऱ्या दीक्षित कुटुंबासोबत वाद झाले. मुळे यांनी गणेशला कॉल करून घरी बोलावले. दीक्षित कुटुंबाने सागर, शुभमला बोलावले. जुने शत्रुत्व असलेले गणेश, सागर समोरासमोर येताच त्यांच्यात हाणामारी सुरू झाली व सागरने गणेशच्या छातीत चाकू खुपसला. गणेशचा जागीच मृत्यू झाला.
नशा, गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधपुंडलिकनगर पोलिसांनी तत्काळ सागर, शुभमसह बहीण - भाऊ अमृता व नीलेश कमलाकर दीक्षित, त्यांची आई गिरिजा कमलाकर दीक्षित (रा. गुरुदत्तनगर, गारखेडा) यांना अटक केली. तेव्हा सागरच्या खिशात नशेच्या ८ गोळ्या आढळल्या. बायजीपुऱ्यातील 'पंटर'कडून ८०० रुपयांना त्या आणल्याचे त्याने कबूल केले. हत्येनंतर फेसबुक प्रोफाइल प्रायव्हेट करून डीपीदेखील काढून टाकला. अनेक वर्षांपासून तो पुंडलिकनगरमधील गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या संपर्कात हाेता.
दोन वर्षांपूर्वीचे वादसागरवर २०२१ मध्ये जिन्सी, जवाहरनगर ठाण्यात हत्येचा प्रयत्न, गंभीर मारहाणीचे २ गुन्हे दाखल आहेत. शुभमवर पुंडलिकनगर, जवाहरनगर ठाण्यात दोन गुन्हे नोंद आहेत. दोन वर्षांपूर्वी मृत गणेश व सागरमध्ये वाद झाला होता. तेव्हापासून त्यांच्यात शत्रुत्व होते, अशी कबुली सागरने दिली. अटक केल्यानंतर अमृताला पाहताच तिचा काही दोष नाही, असे तो सतत पोलिसांना सांगत होता. आरोपींना न्यायालयाने १० नाेव्हेंबरपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे सहायक आयुक्त डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.