औरंगाबाद : सेव्हन हिल ते मध्यवर्ती जकात नाका रस्त्यावरील इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णावर योग्य उपचार न केल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनी रुग्णाला जवळच्या एमजीएम रुग्णालयात हलविले.
या घटनेविषयी रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटी चौक परिसरातील २२ वर्षांच्या विवाहितेच्या पोट दुखत असल्याने नातेवाईकांनी तिला गुरुवारी सकाळी ११ वाजता सेव्हन हिल ते जकात नाका रस्त्यावरील इंटरनॅशनल रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी शुक्रवारी सायंकाळी तिची शस्त्रक्रिया केली तेव्हापासून ती बेशुद्ध होती. रात्री साडेअकराच्या सुमारास रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णाला ‘एमजीएम’मध्ये हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी नातेवाईकांना दिला. यानंतर एका रुग्णवाहिकेतून दोन डॉक्टरांसोबत ‘एमजीएम’मध्ये पाठविले. तेथे रुग्णाला नेताच सोबत आलेले डॉक्टर निघून गेले.
तेथील डॉक्टरांनी, ‘रुग्णावर यापूर्वी केलेल्या उपचाराची फाईल वाचून पुढील उपचार करणे शक्य होईल, त्याशिवाय उपचार करू शकत नाही,’ असे सांगितले. त्यामुळे नातेवाईक रुग्णाच्या उपचारासंबंधीची कागदपत्रे आणण्यासाठी इंटरनॅशनल रुग्णालयात गेले, तेव्हा तेथे त्यांना डाॅक्टर भेटले नाहीत. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी तेथील काचेचे दार, स्वागतकक्षातील खुर्ची, बाकडे, फुलदाणीची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मयेकर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
प्रकृती गंभीर झाल्यावर पाठविले दुसऱ्या रुग्णालयातआम्ही काल चालता-बोलत्या रुग्णास उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आज त्या रुग्णावर ऑपरेशन केल्यानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याचे आम्हाला रात्री साडेअकराच्या सुमारास ‘एमजीएम’मध्ये नेण्याचे सांगितले शिवाय उपचाराची कागदपत्रेही न दिल्याने तेथील उपचार थांबले. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी तोडफोड केल्याचे पोलिसांनी सांगितले.