वाळूजमहानगर : कोणत्याही अग्निशमन यंत्रणेची उभारणी न करता, सोयी-सुविधा न देता कारखाना सुरू करून अग्नितांडवात सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली अन् पालकमंत्री संदीपान भुमरे व पोलिस आयुक्त मनोज लोहिया तसेच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आ. संजय सिरसाट यांनी सकाळी भेट दिली. घटनास्थळाची परिस्थिती पाहून एमआयडीसी व प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करीत असुरक्षितता आणि दुर्लक्षपणाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली.
कामगारांच्या जिवाशी खेळ आणि शासकीय यंत्रणा अंधारात राहणे ही पद्धत धोकादायक आहे. फायर एनओसी कधी घेतली, स्ट्रक्चरल ऑडिट कधी झाले, अतिशय अपुऱ्या जागेत कारखाना तसेच बचावासाठी बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग नाही, असे असताना त्याकडे अधिकारीवर्गाने पाहिले का नाही, औद्योगिक क्षेत्रात असुरक्षित असे किती कारखाने चालू आहेत. किती जणांच्या जीवन-मरणाचा खेळ खेळला जात आहे. वर्षाच्या शेवटचा दिवसाला घडलेली दुर्घटना अत्यंत निंदनीय असून, कामगार कुटुंबीयांना विमा तसेच भविष्य निर्वाह निधी तसेच इतर सुविधा मिळण्यासाठी कंपनीने काय काम केलेले आहे, अशी विचारणा एमआयडीसीच्या अधिकारी वर्गाने केली.
कंपनी मालक कोण, ठेकेदार कुठला आणि त्यांना कारखान्यात राहण्यासाठीची परवानगी कुणी दिली अशी प्रश्नांची सरबत्ती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, उपअभियंता गणेश मोळीकर, अरुण पवार तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांना सखोल चौकशी करण्याचे व माहिती देण्याचे पालकमंत्री भुमरे यांनी सुनावले.
असुरक्षित जागेत व्यवसाय करणाऱ्यांत धांदल..औद्योगिक परिसरात पोट भाडेकरू तसेच कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची या घटनेने चांगलीच धांदल उडाली आहे. किती कारखान्यांकडे अग्निशामक विभागाची तसेच पर्यावरण विभाग, औद्योगिक सुरक्षा विभागाची परवानगी आहे. दरवर्षी नुतनीकरण करतात काय? अशी विचारणा केली.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा...असुरक्षितपणे काम करणाऱ्या कामगारांचा जीव अपघातात गेला असून, कारखान्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी क्रांती माथाडी कामगार संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शरद कीर्तीकर, प्रवीण नितनवरे, सुखदेव सोनवणे, अर्जुन आदमाने, आदींनी केली आहे.