औरंगाबाद : तीन महिन्यापूर्वी सुखना नदीपात्रात दुचाकीसह मृतावस्थेत आढळलेल्या तरूणाची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. वहिनीवर वाईट नजर असल्याच्या संशयावरून या तरूणाच्या डोक्यात धारदार कोयता आणि कु-हाडीने वार करून हत्या केल्याप्रकरणी गुन्हेशाखा पोलिसांनी आज चार तरूणांना अटक केली.
नारायण रतन गरंडवाल(२५), समाधान गणेश कालभिले(२३), राजू तुळशीराम पवार(२१) आणि सुनील गणेश घोगरे (२१, सर्व रा.जुना चिकलठाणा बायपास रोड परिसर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर कृष्णा एकनाथ कोरडे(२२,रा. जुना चिकलठाणा) असे मृत तरूणाचे नाव आहे. गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात म्हणाले की, कृष्णा आणि आरोपी एकाच परिसरातील रहिवासी आहेत. कृष्णा हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. आरोपी नारायणच्या भावाला कृष्णाची वहिनीवर वाईट नजर असल्याचा संशय होता. यावरून त्याच्या भावासोबत जुलै महिन्यात भांडणही झाले होते. ही बाब नारायणला माहित झाल्याने त्याने कृष्णाचा काटा काढण्यासाठी तीन मित्रांच्या मदतीने कट रचला.
कटानुसार १५ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास नारायण हा कृष्णाला जेवण करण्याच्या बहाण्याने एका हॉटेलवर घेऊन गेला. तेथे दोघांनी एकत्र मद्य प्राशन केल्यानंतर जेवण केले. यानंतर कृष्णाच्या मागे दुचाकीने बसून ते घरी जात असताना सुखना नदीच्या काठावर लघूशंकेच्या बहाण्याने दुचाकी थांबविली. यावेळी नारायणने अन्य आरोपींना फोन करून बोलावून घेतले. यावेळी नारायणने कृष्णाशी वाद उकरून काढून भांडण सुरू केले. यावेळी कृष्णाने नारायणची कॉलर पकडताच, आधीच तेथे लपून बसलेल्या अन्य आरोपींनी धारदार कु-हाड आणि कोयत्याने त्याच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर आरोपींनी कृष्णाला दुचाकीसह नदीत ढकलून दिले व तेथून पसार झाले. त्यावेळी सुखना नदीला पूर आलेला होता.
दुस-या दिवशी कृष्णाचे प्रेत आणि दुचाकी नदीपात्रात आढळले होते. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पुरात दुचाकीसह वाहून गेल्याने कृष्णाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली होती. दरम्यान, याप्रकरणी मृताचा भाऊ संजय याने भावाच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त करणारे पत्र गुन्हेशाखा निरीक्षक यांना दिड महिन्यापूर्वी पाठविले होते. याप्रकरणी पो.नि.शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव, नस्सीम पठाण, कर्मचारी समद पठाण, प्रदीप शिंदे, रमेश भालेराव, संदीप बीडकर, भावलाल चव्हाण, रितेश जाधव यांनी गुन्ह्याची उकल करत आरोपींना अटक केली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.