लोकमत न्यूज नेटवर्क
लासुरगाव : वैजापूर तालुक्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावरील अवजड वाहनांमुळे तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ठेकेदाराने तालुक्यातील अंतर्गत रस्ते दुरूस्त करावे अन्यथा महामार्गाचे काम करू न देण्याचा इशारा लासुरगाव, राहेगाव, भायगाव येथील नागरिकांना दिला होता.
त्यानुसार १ मार्चपासून गावकऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू करून रस्त्याच्या मधोमध ठिय्या दिला. अखेर समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पुढील पंधरा दिवसात अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करून दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
समृद्धी महामार्गाच्या कामामुळे लासुरगाव ते राहेगाव व भायगाव गंगापर्यंत रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. परंतु, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर ग्रुप ग्रामपंचायत राहेगाव, ग्रामपंचायत भायगाव गंगा, ग्रामपंचायत धोंदलगाव येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी लासुरगावजवळ समृद्धी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाठिकाणी कामबंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर समृद्धी महामार्ग अधिकाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, दिलेल्या मुदतीत काम झाले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला. यावेळी तीनही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.