छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्यातील होमिओपॅथीच्या डॉक्टरांना अखेर त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधी देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी फक्त 'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी) उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांनाच लागू होणार आहे. जिल्ह्यात आजघडीला सुमारे ३०० होमिओपॅथी डाॅक्टर्स ‘सीसीएमपी’ उत्तीर्ण असून, ते आता ॲलोपॅथी औषधी देऊ शकणार आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आणि घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील जवळपास ९० हजार होमिओपॅथी डॉक्टरांना लाभ होईल. हे डॉक्टर महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेकडे नोंदणीकृत आहेत. यातील २५ हजार डॉक्टरांनी ‘सीसीएमपी’ हा अभ्यासक्रम यापूर्वीच पूर्ण केलेला आहे.
राज्य पातळीची संघटना होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशन (हिम्पम) महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलने केली. दवाखाने बंद ठेवली. या लढ्याला यश मिळाले आणि नोंदणीकृत डॉक्टरांसाठी एक वर्षाचा कोर्स करण्यात आला. २०१४ मध्ये निर्णयाची अंमलबजावणी झाली. त्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाने ॲलोपॅथी औषधी देण्यासाठी मान्यता दिली. डॉ. दीपक सावंत, डॉ. सुधीर राव, डॉ. राजेश राव, डॉ. परेश नवलकर, डॉ. अरुण भस्मे, डॉ. सुभाष राऊत, डॉ. डी. बी. चौधरी, डॉ. रवींद्र पारख, डॉ. हरीश, महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा, डॉ. रजनी इंदूरकर , डॉ. बाळासाहेब पवार, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे माजी उपाध्यक्ष डॉ. प्रकाश झांबड आदींनी यासाठी पाठपुरावा, आंदोलने केली आणि अखेर त्याला यश मिळाले.
जिल्ह्यात एक हजार होमिओपॅथी डाॅक्टर्सजिल्ह्यात सुमारे एक हजार होमिओपॅथी डाॅक्टर्स आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दरवर्षी ५० जणांना 'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी) करता येत असल्याचे संघटनेने सांगितले.