औरंगाबाद : एसटीच्या शिवशाही बसचालकाने सोमवारी (दि. २५) दुपारी नगर नाका येथे कोरोना तपासणी करणाऱ्या केंद्रावरील दोन रिकाम्या खुर्च्यांवरून बस नेली. बसमधील प्रवाशांना कोरोना तपासणीची विनंती करणाऱ्या दोन मनपा कर्मचाऱ्यांचे या चालकाने अपहरण करून थेट मध्यवर्ती बसस्थानकात आणले. संध्याकाळपर्यंत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
रविवारी झाल्टा फाटा येथून एका ट्रॅव्हल्सचालकाने कोरोनायोद्ध्याचे अपहरण केले होते. या प्रकरणात दोषी चालक आणि क्लिनरवर सिडको एमआयडीसी ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. कोविडच्या आपत्ती व्यवस्थापनाचे कलम लावण्यात आले नाही. या धक्क्यातून मनपाने कर्मचारी सावरलेले नसताना सोमवारी नगर नाका येथे दुसरा थरार घडला. नगरहून औरंगाबादकडे येणाऱ्या शिवशाही बसला (क्र. एमएच-२०टी ९२४६) नगर नाक्यावर मनपा कर्मचाऱ्यांनी अडविले. नेहमीप्रमाणे सर्व प्रवाशांना कोरोना तपासणी करण्याचे आवाहन करण्यासाठी बसमध्ये मनपाचे कंत्राटी कर्मचारी अमोल खालेकर, अक्षय शेळके गेले. प्रवाशांसह चालकही मनपा कर्मचाऱ्यांसोबत अत्यंत असभ्य भाषेत बोलू लागला. काही कळण्यापूर्वीच चालकाने केंद्रासमोर ठेवलेल्या दोन रिकाम्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवरून बस पुढे नेली. मनपा कर्मचारी आरडाओरड करू लागले. प्रवासीही बसचालकाला ‘यांना बसस्थानकात नेऊन दाखवू’ असे म्हणू लागले. बस मध्यवर्ती बसस्थानकात आणण्यात आली. तेथून पळ काढून कर्मचाऱ्यांनी मनपा मुख्यालय गाठून वरिष्ठांना घटना सांगितली. मात्र रात्री उशिरापर्यंत चालक, प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशीरविवारी झाल्टा फाटा येथे कैलास जाधव या कर्मचाऱ्याचे एका ट्रॅव्हल्सचालकाने अपहरण केले होते. या घटनेत धाडसाने मुकाबला करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सोमवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट घेतली. सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा उपस्थित होते.
मजुरी करू; पण...कोरोना तपासणी, लसीकरणासाठी मनपात कंत्राटी पद्धतीवर १३६ कर्मचारी आहेत. दररोज ४०० रुपये मानधनावर हे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करतात. अपहरण, अंगावर वाहने घालून घेण्यापेक्षा मोलमजुरी करून रोज ५०० रुपये कमवू, असे या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सांगत आहेत. दोन-दोन महिने पगार नसतानाही हे कर्मचारी काम करीत आहेत.