सिल्लोड/गोळेगाव : तालुक्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. गोळेगाव-उंडनगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोळेगावजवळ असलेल्या जुई नदीला पूर आला. तर जुईनदीवरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाशेजारी दहा दिवसापूर्वी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्तादेखील पाण्यात बुडाला. तर रस्त्याचा काही भाग पुन्हा ढासळला गेला आहे. त्यामुळे जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प झाली होती. रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
सिल्लोड तालुक्यात सर्वदूर दुपारी तीन ते चार वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. गोळेगाव जवळील जुई नदीला चार वाजताच्या दरम्यान मोठा पूर आला. नवीन बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळील बनवलेला पर्यायी रस्ता पूर्ण पाण्याने बुडाला होता. यामुळे रस्त्याच्या कडेचा काही भाग ढासळला गेला. रस्ता पुन्हा तयार करण्यासाठी ठेकेदाराने जेसीबी, पोकलँड, मुरुमने भरलेले हायवा रात्री उशिरा आणले. पाणी थांबल्यावर मुरुमाची भरती करून तब्बल पाच ते सहा तासांनी जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. तर काही वाहने अनवा, शिवना, अजिंठा, उंडनगाव, हलदा, सोयगावमार्गे पर्यायी मार्गाने पाठविण्यात आली.
दहा दिवसापूर्वी वाहून गेला होता रस्ता
गोळेगाव मंडळात २९ मे रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे जुई नदीला असाच पूर आल्याने पर्यायी रस्ता पूर्णतः वाहून गेला होता. तेव्हा २४ तास वाहतूक ठप्प झाली होती. ठेकेदाराने शर्थीचे प्रयत्न केल्याने २४ तासाने रस्ता तयार झाला होता. पण अवघ्या दहा दिवसात पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने हा बनविलेला रस्ता पुन्हा पाण्यात बुडाला.
----
१) गोळेगाव येथील जुई नदीला आलेल्या पुरामुळे पर्यायी रस्त्यावरून वाहणारे पाणी दिसत आहे.