हिंगोली : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या दलितवस्ती सुधार योजनेच्या मुद्यावरून अजूनही रणकंदन सुरूच आहे. सरपंच मंडळी जि. प. पदाधिकारी व सदस्यांकडे याबाबत तगादा लावत असल्याने दर चार-दोन दिवसांनी वातावरण तापत आहे.जि. प. च्या समाजकल्याण विभागाला यावर्षी १९.१४ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातून ३१७ दलित वस्त्यांत कामे मंजूर आहेत. परंतु ही कामे करताना निविदा प्रक्रिया करायची की, ग्रा. पं. ला कामे करायची असल्यास त्यांना ती करता येतील, याचा संभ्रम अजूनही दूर झाला नाही. ई-निविदेच्या प्रकरणांवरून सरपंच व बीडीओंत ताणाताणी होत आहे. त्यामुळे सरपंचमंडळी जि. प. पदाधिकाऱ्यांकडे येवून ओरड करीत आहे. काही जि. प. सदस्यही त्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे अशा मंडळींचा वावर मागील काही दिवसांत वाढला आहे. स्थायी समितीची बुधवारी बैठक होणार आहे. यामध्ये या विषयावर पुन्हा चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने सदस्यांनी पेरणीही केली आहे. जनसुविधेतील कामांनाही असेच शुक्लकाष्ट लागले होते. मात्र ते आता मार्गी लागले आहे. दलित वस्तीचा मुद्दा निकाली निघण्याची प्रतीक्षा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पुन्हा दलितवस्तीचा निधी चर्चेत
By admin | Published: February 23, 2016 11:48 PM