औरंगाबाद : लक्ष्मणचावडी ते एमजीएम रस्ता गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने दीड महिन्यापूर्वी कंत्राटदाराला वर्कआॅर्डर दिली. आता प्रत्यक्षात काम सुरू करायची वेळ आल्यावर मनपा प्रशासनासमोर कामातील विघ्न दूर करण्याचे मोठे आव्हान येऊन उभे राहिले आहे. या रस्त्यात २६ विजेचे पोल, सहा डी.पी. शिफ्ट कराव्यालागणार आहेत. भूसंपादनानंतर रोड होत असल्याने नगररचना विभागाला मार्किंग करून द्यावी लागणार आहे. त्यासाठी मनपाचा नगररचना विभाग मागील काही दिवसांपासून टाळाटाळ करीत आहे.
मागील दहा वर्षांपासून एमजीएम ते लक्ष्मण चावडी रस्त्याचा प्रश्न रखडला आहे. अगोदर भूसंपादन होत नव्हते. २०११-१२ मध्ये तत्कालीन मनपा आयुक्तांनी भूसंपादनही करून दिले. प्रत्यक्षात रस्ता तयार करण्यासाठी मनपाकडे पैसा नव्हता. शासन निधी आणि मनपा फंडातून १४ कोटी रुपये खर्च करून रस्ता तयार करण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेण्यात आला. यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. ए.एस. कन्स्ट्रक्शनने पाच टक्के कमी दराने निविदा भरली. याच कंत्राटदाराला दीड महिन्यापूर्वी काम देण्यात आले. कडक उन्हाळा सुरू झाल्यावर कंत्राटदाराला सिमेंट रस्ता तयार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
या रस्त्यात वीज कंपनीचे २६ पोल आणि ६ डी.पी. अडथळा आणत आहेत. वीज कंपनीकडूनच त्यांचे शिफ्टिंग करावे लागणार आहे. मनपाने अद्याप वीज कंपनीकडून पोल, डी.पी. शिफ्टिंगचे कोटेशनही घेतलेले नाही. कोटेशन मिळवून पैसे भरून काम करण्यासाठी आणखी दोन महिने किमान लागण्याची शक्यता आहे. महापालिकेने या रस्त्यावर सक्तीने भूसंपादन केले होते. हे भूसंपादन अनेकांना मान्य नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे. न्यायप्रविष्ट मालमत्तांसमोरील रोड सोडून उर्वरित काम करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. मनपाच्या नगररचना विभागाने १८ मीटर रस्ता तयार करण्यासाठी मार्किंग केलेले नाही.
३ मार्च रोजी बैठकएमजीएम ते लक्ष्मण चावडी रस्त्यावरील विजेचे पोल शिफ्ट करणे, मार्किंग करणे आदी कामांसाठी शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी ३ मार्च रोजी संबंधित विभागातील अधिका-यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दोन्ही विषयांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पानझडे यांनी नमूद केले.